वृत्तसंस्था / बेंगळूर
चीनमधील हांगझोयु येथे होणाऱ्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी भारतीय पुरुष हॉकी संघाने हांगझोयुला प्रयाण केले. या स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचा सलामीचा सामना 24 सप्टेंबरला उझ्बेकिस्तानबरोबर होणार आहे.
अलीकडच्या कालावधीत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय पुरुष हॅकी संघाची कामगिरी पुर्वीच्या तुलनेत निश्चितच समाधानकार होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. अलीकडेच भारतीय हॉकी संघाने आशियाई चषक स्पर्धा जिंकली होती. हेंगझोयु येथे होणाऱ्या आशिया क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकी क्रीडा प्रकारात भारताचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटामध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान, जपान, बांगलादेश, सिंगापूर आणि उझ्बेकिस्तान यांचा समावेश आहे. ब गटात कोरिया मलेशिया चीन ओमान, थायलंड आणि इंडोनेशिया या संघांचा सहभाग राहिल. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व हरमनप्रित सिंगकडे सोपवण्यात आले आहे. भारतीय बचावफळीतील हरमनप्रित सिंग हा एक भक्कम खेळाडू म्हणून ओळखला जातो. हार्दिक सिंगकडे उपकर्णधारपद राहील. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाने गेल्या काही दिवसापासून कसुन सराव केला आहे. चेन्नईत 2023 च्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवल्याने भारतीय हॉकी संघांचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे. या आगामी स्पर्धेत भारतीय संघ सुवर्णपदक मिळवण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास कर्णधार हरमनप्रित सिंगने बेंगळूरमध्ये प्रयाणापूर्वी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला. भारतीय हॉकी संघामध्ये पी. आर. श्रीजेश, कृष्णन फाटक, वरुण कुमार, एक गोलरक्षक असून अमित रोहिदास, जर्मनप्रित सिंग, हरमनप्रित सिंग आणि संजय यांच्यावर बचावफळीची जबाबदारी राहील. निलकांत शर्मा, हार्दिक सिंग, मनप्रित सिंग, विवेक सागर प्रसाद, सुमित,समशेर सिंग हे मध्यफळीत खेळतील. अभिषेक, गुरुजंत सिंग, मनदीपसिंग, सुखजित सिंग अणि ललितकुमार उपाध्याय हे आघाडी फळी सांभाळतील. या स्पर्धेसाठी भारतीय संघातील खेळाडू पुर्णपणे शारीरिक तंदुरुस्त आणि मानसिक कणखर असल्याचे उपकर्णधार हार्दिक सिंगने म्हटले आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना उझ्बेकबरोबर 24 सप्टेंबरला, सिंगापूर बरोबर 26 सप्टेंबरला, जपानबरोबर 28 सप्टेंबरला तर पाक बरोबर 30 सप्टेंबरला भारताचे सामने होतील. त्यानंतर भारताचा आपल्या गटातील शेवटचा सामना बांगलादेशबरोबर 2 ऑक्टोबरला होणार आहे.









