वृत्तसंस्था / बेंगळूर
हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी येथून ऑस्ट्रेलियाला प्रयाण केले. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय हॉकी संघ यजमान ऑस्ट्रेलिया संघाबरोबर चार सामन्यांची हॉकी मालिका खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियातील पर्थ हॉकी स्टेडियममध्ये चार सामन्यांची हॉकी मालिका 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान आयोजित केली आहे. आगामी होणाऱ्या 2025 च्या हिरो पुरस्कृत आशिया चषक हॉकी स्पर्धेपूर्वी भारतीय पुरुष हॉकी संघाला सरावाकरिता ऑस्ट्रेलियाचा दौरा आयोजित केला आहे. आशिया चषक हॉकी स्पर्धा चालु महिन्याच्या अखेरीस बिहारमधील राजगीर येथे होणार आहे.
ऑस्ट्रेलियन हॉकी संघ हा जागतिक हॉकी क्षेत्रातील इक बलवान आणि दर्जेदार म्हणून ओळखला जातो. 2024-25 च्या युरोपमध्ये झालेल्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामने खेळविले गेले होते. या स्पर्धेतील दोन्ही टप्प्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियावर 3-2 असा विजय मिळविला होता. 1972 च्या म्युनिच ऑलिम्पिकनंतर भारतीय हॉकी संघाचा पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिला विजय होता. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय हॉकी संघामध्ये अनुभवी आणि नवोदित खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या हॉकी सामन्यात 15, 16, 19 आणि 21 ऑगस्ट रोजी खेळविले जातील









