वृत्तसंस्था/ राजगीर
तीन वेळचा विजेता भारत आठ वर्षांच्या अंतरानंतर पुऊष आशिया चषक हॉकीचे विजेतेपद पुन्हा मिळवण्याचा आणि पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचा विश्वास बाळगून आहे. ही खंडीय स्पर्धा 29 ऑगस्टपासून येथे सुरू होणार आहे. ऑलिंपिक कांस्यपदक विजेता आणि सध्या खंडातील अव्वल संघ असलेल्या भारताने 2017 मध्ये ढाका येथे अंतिम फेरीत मलेशियाला 2-1 असे हरवून आशिया चषक जिंकला होता.
2022 मध्ये जकार्ता येथे झालेल्या स्पर्धेच्या शेवटच्या आवृत्तीत विजेता दक्षिण कोरिया आणि मलेशियाच्या मागे भारत तिसऱ्या स्थानावर राहिला होता. ‘या स्पर्धेसाठी संघाची तयारी चांगली आहे. आमचा दृष्टिकोन पॅरिस ऑलिंपिकसारखाच असेल जिथे आम्ही गट टप्प्यात चांगल्या विजयांसह सुऊवात केली होती. आम्हाला येथेही चांगली सुऊवात करायची आहे. एकेक सामना आम्ही हाताळत जाऊ. आम्हाला गती वाढवत न्यायची आहे आणि आम्हाला माहिती आहे की, भारताने शेवटचे विजेतेपद जिंकून आठ वर्षे झाली आहेत. आम्हाला जिंकण्याचा आत्मविश्वास असला, तरी आम्ही कोणत्याही संघाला हलक्याने घेऊ इच्छित नाही, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी स्पर्धेसाठी येथे आल्यानंतर सांगितले.
विश्वचषक पात्रता पणाला लागलेली असताना भारताने हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली येथे एक मजबूत संघ उतरविला आहे. पुढील वर्षीचा विश्वचषक 14 ते 30 ऑगस्ट दरम्यान बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. भारतीय पुऊष हॉकी संघ राजगीरमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी बिहारमध्ये येऊन आम्हाला खूप आनंद होत आहे. येथे आंतरराष्ट्रीय हॉकीचे आयोजन होत आहे हे खूप छान आहे आणि आम्हाला या प्रदेशातील लोकांना आमच्या खेळाने प्रेरित करायचे आहे आणि या खेळाचे अधिक चाहते निर्माण करायचे आहेत, असे फुल्टन म्हणाले.
भारताचा कर्णधार हरमनप्रीतनेही अशाच भावना व्यक्त केल्या. आम्ही कधीही बिहारमध्ये खेळलो नाही आणि राजगीर एका वर्षाच्या आत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करत आहे हे पाहून खूप आनंद होत आहे. यावरून सरकारचा खेळाला पाठिंबा देण्याचा हेतू दिसून येतो आणि संपूर्ण स्पर्धेत येथील हॉकी चाहत्यांच्यो प्रेम आणि पाठिंब्याची आम्हाला अपेक्षा आहे, असे त्याने सांगितले. भारताला जपान, चीन आणि कझाकस्तानसह गट ‘अ’मध्ये स्थान देण्यात आले आहे, तर गट ‘ब’मध्ये मलेशिया, कोरिया, बांगलादेश आणि चिनी तैपेई यांचा समावेश आहे.









