वृत्तसंस्था/ बेंगळूर
29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान ओमान येथे होणाऱ्या आशियाई हॉकी फाईव्ज विश्वचषक पात्र फेरीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भातीय हॉकी संघ रविवारी ओमानला रवाना झाला. या स्पर्धेत भारताचा इलाईट गटात समावेश असून या गटामध्ये मलेशिया, पाक, जपान, ओमान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा सलामीचा सामना मंगळवार 29 ऑगस्ट रोजी बांगलादेशबरोबर होणार आहे. या स्पर्धेसाठी दोन गट करण्यात आले आहे. चॅलेंजर्स गटामध्ये हाँगकाँग, चीन, इंडोनेशिया, अफगाण, कजाकस्तान यांचा समावेश आहे. भारताचा सलामीचा सामना बांगलादेशबरोबर झाल्यानंतर पुढील सामना सामना ओमान आणि पाकिस्तानबरोबर बुधवारी खेळवले जाणार आहेत. त्यानंतर भारताचे सामने गुरुवार 31 ऑगस्ट रोजी मलेशिया आणि जपानबरोबर होतील. 2024 साली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉकी 5एस विश्वचषक स्पर्धेसाठी 16 संघातून केवळ एका संघाला पात्रतेची संधी मिळणार आहे. या आगामी स्पर्धेचे यजमानपद ओमानला मिळाले असल्याने यजमान देश म्हणून त्यांना या स्पर्धेचे तिकीट यापूर्वीच मिळाले आहे.
या स्पर्धेसाठी मनदीप मोरकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून मोहमद रहिल मुसेन हा उपकर्णधार राहिल. सुरज करकेराकडे गोलरक्षणाची जबाबदारी राहिल. बचावफळीमध्ये जुगराज सिंग, दीपसेन तिर्की, मनदीप मोर आणि सुखविंदर यांचा समावेश आहे. मध्यफळीची जबाबदारी मनिंदर सिंग आणि मोहमद राहिल तर आघाडी फळीची जबाबदारी पवन राजबर व गुरुजोत सिंग यांच्यावर टाकण्यात आली आहे.
भारतीय हॉकी संघ : सुरज करकेरा, जुगराज सिंग, दीपसेन तिर्की, सुखविंदर, मनदीप मोर (कर्णधार), मनिंदर सिंग, मोहमद राहिल, पवन राजबर आणि गुरुजोत सिंग.









