वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हातोडाफेकपटू रचना कुमारीला आंतरराष्ट्रीय महासंघाच्या अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने (एआययू) अनेक डोप चाचण्यांत अपयशी ठरल्यामुळे 12 वर्षांची बंदी घातली आहे. 30 वर्षीय कुमारीचे डोप नमुने स्पर्धेबाहेर घेण्यात आले होते. त्यात स्टॅनोझोलॉल, मेटांडिएनोन, डिहाइड्रोक्लोरोमेथाइलटेस्टोस्टेरोन आणि क्लेनब्युटेरॉल हे स्टिरॉइड्स आढळले आहेत.
‘एआययू’ने कुमारी (के. एम.) रचना (भारत) हिच्यावर 24 नोव्हेंबर, 2023 पासून 12 वर्षांसाठी प्रतिबंधित पदार्थाच्या वापरासाठी बंदी घातली आहे. 24 सप्टेंबर, 2013 चे हे निकाल आहेत. असे ‘एआययू’ने ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या मजकुरात म्हटले आहे. त्यामुळे 24 सप्टेंबर, 2023 पासूनचे तिचे सर्व निकाल अपात्र ठरले आहेत. यामध्ये कोणतेही विजेतेपद, पुरस्कार, पदक, गुण, बक्षीस आणि ‘अॅपियरन्स मनी’ गमावणे समाविष्ट आहे. कुमारीचे हे दुसरे डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन आहे.
‘एआययू’ने नमूद केले आहे की, कुमारीच्या 10 फेब्रुवारी, 2015 रोजी गोळा केलेल्या नमुन्यात मेटेनोलोन सापडल्याने डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 18 मार्च, 2015 ते 17 मार्च, 2019 पर्यंत चार वर्षांची बंदी तिच्यावर घालण्यात आली होती. कुमारी हांगझाऊ आशियाई खेळांमध्ये भाग घेतलेल्या 68 सदस्यीय भारतीय अॅथलेटिक्स संघाचा भाग होती. 29 सप्टेंबर रोजी झालेल्या महिलांच्या हातोडाफेक स्पर्धेत 58.13 मीटर हातोडाफेक करून तिने नववे स्थान पटकावले होते.









