पहिल्याच सामन्यात उडवला विंडीजचा धुव्वा : सामनावीर जोशिताचे दोन बळी
वृत्तसंस्था/ क्वालालम्पूर
भारतीय संघाने 19 वर्षांखालील महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देत दणक्यात मोहिमेला सुरुवात केली आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना विंडीज महिला संघ 44 धावांत ऑलआऊट झाला, ही त्यांची स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या होती. यानंतर वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेले आव्हान भारतीय महिलांनी अवघ्या 26 चेंडू गाठत विजयी सलामी दिली. भारतीय गोलंदाज व्हीजे जोशिताला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीपासूनच हा निर्णय योग्य ठरला. कॅरिबियन संघाने पहिल्या पाच षटकांतच तीन विकेट गमावल्या. ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या यादरम्यान, अॅस्बी कॅलेंडरने 12 धावा केल्या आणि कर्णधार समारा रामनाथने 3 धावा केल्या, तर नजन्नी कंबरबॅच, जहझारा क्लॅक्सटन आणि ब्रायना हरिचरण यांना त्यांचे खातेही उघडता आले नाही. केनिका कैसरने 15 धावा केल्या आणि ती डावात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती. इतर कोणत्याही विंडीज महिला फलंदाजाला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही, यामुळे विंडीजचा संघ 13.2 षटकांत 44 धावांत ऑलआऊट झाला. वेस्ट इंडिजच्या डावात पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. भारतीय संघाकडून पारुनिका सिसोदियाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. दरम्यान, व्हीजे जोशिता आणि आयुषी शुक्ला यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
टीम इंडियाने गाठले सहज लक्ष्य
45 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 4 धावांवर आपली पहिली एकमेव विकेट गमावली. मात्र त्यानंतर भारतीय फलंदाजांनी वेस्ट इंडिजला विकेट घेण्याची दुसरी संधी दिली नाही. कमलिनी आणि सानिका चाळके यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 43 धावांची नाबाद भागीदारी झाली. कमालिनी हिने 3 चौकारासह नाबाद 16 तर सानिकाने 3 चौकारासह नाबाद 18 धावांची खेळी करत संघाला 4.2 षटकांत सहज विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज 13.2 षटकांत सर्वबाद 44 (अॅस्बी कॅलेंडर 12, केनिका कैसर 15, पारुनिका 3 बळी, जोशिता व आयुषी प्रत्येकी 2 बळी).
भारत 4.2 षटकांत 1 बाद 47 (त्रिशा 4, कमालिनी नाबाद 16, सानिका नाबाद 18, क्लॅक्सटन एक बळी).









