पँको न्यायालयाचा भारतीय पालकांना ताबा देण्यास नकार :
► वृत्तसंस्था / बर्लिन
जर्मनीतील पँको न्यायालयाने 27 महिन्यांची मुलगी आरिहा शाहचा ताबा तिच्या भारतीय आईवडिलांना सोपविण्यास नकार दिला आहे. आरिहा ही सप्टेंबर 2021 पासून जर्मनीच्या यूथ वेलफेयर ऑफिसच्या देखरेखीत आहे. जर्मनीने आरिहाच्या आईवडिलांना तिला ईजा पोहोचविल्याचा आरोप करत तिचा ताबा मिळविला होता.
आरिहाला किरकोळ ईजा झाल्याचा युक्तिवाद न्यायालयाने सुनावणीदरम्यान फेटाळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेश एस. जयशंकर यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून ते आरिहाला परत भारतात आणतील असे आरिहाच्या आईवडिलांनी म्हटले आहे.
न्यायालयाने आरिहाचा ताबा सोपविण्यास न्यायालयाने नकार दिला होता. यानंतर आरिहाच्या आईने मुलीला इंडियन वेलफेअर सर्व्हिसेसकडे सोपविण्यात यावी, जेणेकरून ती स्वत:च्या भारतीय मूल्यांपासून दूर राहू नये, अशी विनंती न्यायालयाला केली होती. आरिहा स्वत:च्या प्रथा-परंपरांपासून दूर होत चालली आहे. आम्ही मांसाहार ग्रहण करत नव्हतो. परंतु फोस्टर केयरमध्ये तिला हे सर्व काही खावे लागत आहे, असा आरोप तिची आई धारा यांनी केला आहे.

चाइल्ड केयर युनिटमध्ये आरिहा
2021 मध्ये आरिहा सुमारे 7 महिन्यांची होती, तेव्हा तिची आजी जर्मनीत पोहोचली होती. तिच्या आजीकडून चुकून आरिहाला ईजा पोहोचली होती. डायपरमध्ये रक्त दिसल्यावर आरिहाच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेले होते. तेथे जर्मनीच्या चाइल्ड केयर युनिटने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर मुलीला तिच्या आईवडिलांपासून दूर करत फॉस्टर केयरमध्ये पाठविण्यात आले होते.
आईवडिलांचे शर्थीचे प्रयत्न
आरिहाचे आईवडिल मागील एक वर्षापासून भारतीय विदेश मंत्रालयाशी संपर्क साधून आहेत. त्यांनी भारत सरकारला याप्रकरणी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले होते. या मुद्द्याच्या गांभीर्याची जाणीव असल्याचे उद्गार जर्मनीचे राजदूत फिलिप एकरमॅन यांनी मागील आठवड्यात काढले होते. मुलीच्या कल्याणाला प्राथमिकता आहे. एखादे मूल स्वत:च्या घरात सुरक्षित नसल्यास यंत्रणा त्यांचा ताबा मिळविते. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून निर्णयानंतरच यावर काही बोलता येईल असे जर्मनीच्या विदेशमंत्री अन्नालेना बेयरबॉक यांनी म्हटले आहे.









