वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अर्दिया येथील कुशैयान अल-मुतैरी हॉल येथे झालेल्या एएफसी फुटसाल आशियाई चषक 2026 पात्रता फेरीच्या गट ‘अ’मधील सामन्यात भारताने उत्साही प्रदर्शन घडविले, परंतु शेवटी यजमान कुवेतविऊद्ध ते अपयशी ठरले. त्यांना 1-4 असा पराभव पत्करावा लागला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अधिकृत वेबसाइटनुसार, कुवेतने मध्यांतराला 2-1 अशी आघाडी घेतली होती.
एएफसी फुटसाल आशियाई चषक पात्रता फेरीतील भारताचा हा दुसरा सामना होता आणि 135 व्या क्रमांकावरील या संघाला चांगलेच माहित होते की, त्यांची गाठ जागतिक क्रमवारीत 43 व्या स्थानावर असलेल्या कुवेतसारख्या जबरदस्त प्रतिस्पर्ध्याशी आहे. अनुभव नसूनही आणि क्रमवारीत बरेच खाली विसावलेले असूनही भारताने इराणी मुख्य प्रशिक्षक रेझा कोर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशंसनीय धैर्य आणि रणनीतीच्या दृष्टीने परिपक्वता दाखवली.
भारताने लढाऊ दृष्टिकोन स्वीकारत आणि मुसंडी मारण्यासाठी जागा शोधून काढत यजमानांना काही प्रमाणात निराश केले. भारतीय बाजूने पोहोचल्यानंतर कुवेतच्या प्रत्येक आक्रमणाला समर्पित बचावाचा सामना करावा लागला. भारताच्या धाडसी प्रयत्नांचे बक्षीस नवव्या मिनिटाला मिळाले. लालसांगकिमाने कुवेतच्या बचावफळीला भेदत चेंडू पुरविला आणि डेव्हिड लालतलानसांगाने त्यावर ताबा मिळवून शक्तिशाली फटका हाणत गोलरक्षक फवाद अल खावारीला धक्का दिला. या गोलाने घरच्या प्रेक्षकांना चकित केले आणि भारताला चांगली आघाडी मिळवून दिली.
हा लालतलानसांगाचा आठवा आंतरराष्ट्रीय गोल होता. पुऊषांच्या फुटसालमध्ये भारताचा तो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. पण कुवेतने त्यानंतर लगेच पुनरागमन केले. एका मिनिटानंतर नासेर अल अबानने सालेह अल फदेलला एक अचूक पास दिला, ज्याने उजव्या पायाने मारलेला फटका बरोबरीचा गोल करून गेला. 18 व्या मिनिटाला अब्दुल अझीझ अल सरराजने गोल करत मध्यंतरापूर्वी कुवेतला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 27 व्या मिनिटाला मोहम्मद अल अजमीने, तर 37 व्या मिनिटाला अल अबासीने गोल करून कुवेतला 4-1 असा विजय मिळवून दिला. भारताचा पुढील सामना आज 22 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.









