वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बैरुतमध्ये आयोजित केलेल्या मित्रत्वाच्या दोन सामन्यापैकी पहिल्या सामन्यात लेबनॉनने भारतीय पुरुष फुटसाल संघाचा 7-2 असा पराभव केला. चालू महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या एएफसी फुटसाल आशिया चषक 2026 च्या पात्र फेरी स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून हे सामने आयोजित केले आहेत.
बैरुतच्या अल सदाका क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात भारतातर्फे डिसोझा आणि माहिप अधिकारी यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. तर लेबनॉनतर्फे मारिओ जेओदीने 5 व्या मिनिटाला हसन मेटोकने 11 व्या मिनिटाला, स्टीव्ह कुकेझीनने 14 व्या मिनिटाला आणि मजिद हमोचने 17 व्या मिनिटाला गोल केले. मध्यंतरापर्यंत लेबनॉनने भारतावर 4-0 अशी आघाडी घेतली होती. लेबनॉनतर्फे कोकीझीनने 27 व्या आणि मेटॉकने 29 व्या मिनिटाला गोल नोंदवून भारताचे आव्हान 7-2 असे संपुष्टात आणले. भारतातर्फे डिसोझाने 31 व्या मिनिटाला तर अधिकारीने 38 व्या मिनिटाला गोल केले. एएफसी फुटसाल आशिया चषक 2026 ची पात्र फेरी स्पर्धा 20 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे.









