बेळगाव : आज सकाळी भारताचा माजी स्टार वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांनी आज खानापूर शहरातील जांबोटी क्रॉस वरील एका हॉटेलमध्ये चहा आणि नाश्त्याचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांना पाहण्यासाठी तरुणांनी एकच गर्दी केली होती.
आज सकाळी साडेआठच्या सुमारास बीएमडब्ल्यू आणि इनोव्हा कारमधून नेहरा व त्यांचे सहकारी खानापुरात दाखल झाले. हॉटेल मालक महंमद नंदगडी हे देखील क्रिकेटप्रेमी असून त्यांनी सुद्धा आशिष नेहरा यांना पाहून थक्क झाले. याची माहिती मिळताच मलप्रभा क्रीडांगणावर क्रिकेट खेळायला आलेल्या खेळाडूंनी सेल्फीसाठी एकच गर्दी केली. यावेळी “मित्रांनो पहिले नाश्ता तरी करू द्या ” असे नेहरा म्हणाले.
काही दिवसांपूर्वी नागुर्डा , ता. खानापूर येथील वैजू निट्टुरकर या युवकाच्या मच्छे येथील चहाच्या दुकानात क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी चहाचा स्वाद घेतला होता आणि आज क्रिकेटर आशिष नेहरा यांनी खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवर दिसून आल्याने बेळगावकरांना दोन दिग्गज क्रिकेटर्सना प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळाली.