वृत्तसंस्था/ म्युनिच
जर्मनीतील शहर म्युनिचमध्ये सध्या सुरक्षा परिषदेचे आयोजन असून यात जगभरातील प्रतिनिधी सामील झाले आहेत. या सुरक्षा परिषदेत जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ज यांनी भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांचा उल्लेख केला आहे. जयशंकर यांनी युरोपसंबंधी केलेल्या टिप्पणीला शोल्ज यांनी योग्य ठरवत त्यांचे समर्थन केले आहे. जयशंकर यांनी मागील वर्षी जून महिन्यात स्लोवाकियामध्ये आयोजित एका संमेलनात युरोपसंबंधी केलेली टिप्पणी जगभरात लक्षवेधी ठरली होती. त्यांच्या या टिप्पणीचे कौतुकही मोठय़ा प्रमाणावर झाले होते. तसेच सोशल मीडियावर ही टिप्पणी मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाली होती.

जयशंकर यांच्या ‘युरोपियन विचारसरणी’च्या टिप्पणीचे शोल्ज यांनी समर्थन केले आहे. मजबूत देशांचे कायदे स्वतःला आंतरराष्ट्रीय संबंधांवर थोपवू लागल्यास ही केवळ युरोपची समस्या राहणार नसल्याचे शोल्ज यांनी म्हटले आहे. जयशंकर यांनी स्लोवाकियामध्ये आयोजित ग्लोबसेक ब्रॅटिस्लावा फोरममध्ये बोलताना युरोपला त्याच्या भूमिकेवरून चांगलेच फटकारले होते. तसेच त्यांनी रशिया-युक्रेन युद्धासंबंधी भारताची भूमिका स्पष्ट केली होती. युरोपने आता स्वतःच्या समस्या या पूर्ण जगाच्या समस्या आहेत आणि पूर्ण जगाच्या समस्यांशी युरोपचे कुठलेच देणेघेणे नाही या मानसिकतेतून बाहेर पडावे असे जयशंकर यांनी सुनावले होते.
स्वतःच्या समस्या पूर्ण जगाच्या समस्या आहेत आणि पूर्ण जगाच्या समस्यांशी युरोपचे कुठलेच देणेघेणे नाही या मानसिकतेतून युरोपला बाहेर पडावे लागणार आहे. भारताचे विदेशमंत्री जयशंकर यांचे हे विधान यावेळी म्युनिच सुरक्षा अहवालात नोंदविण्यात आले आहे. जयशंकर यांची ही टिप्पणी बरोबरच असल्याचे शोल्ज यांनी म्हटले आहे.
युरोप किंवा उत्तर अमेरिका भारतात विश्वासार्ह ठरण्यासाठी केवळ संयुक्त हितांवर भर देणे पुरेसे नसल्याचे शोल्ज म्हणाले. जर्मन चॅन्सेलर शोल्ज यांच्यानुसार संबंधित देशांचे हितसंबंध आणि चिंताही समजून घ्याव्या लागणार आहेत कारण हेच संयुक्त भागीदारीसाठी महत्त्वपूर्ण आहे. मागील वर्षी 2 जूनमध्ये आयोजित जी-7 शिखर परिषदेदरम्यान चर्चेसाठी आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेचे प्रतिनिधी आले नव्हते, तर अशा क्षेत्रांमधून आलेले लोक होते, ज्यांच्यासोबत मिळून गरीबी आणि उपासमारी दूर करण्याच्या दिशेने काम केले जाऊ शकते असे उद्गार शोल्ज यांनी काढले आहेत.
चीन अन् युक्रेनमध्ये फरक
जयशंकर यांनी युरोपबद्दल बालेताना चीन आणि भारत यांच्यातील झालेल्या घटनाक्रमांचा मुद्दा मांडला तसेच युक्रेनमधील घडामोडींचा उल्लेख केला होता. चीन आणि भारतादरम्यान जो वाद सुरू आहे, तो युक्रेन युद्धापूर्वीपासून अस्तित्वात आहे. अशा स्थितीत युक्रेनप्रकरणी भारताला पाश्चिमात्य आघाडीत कशाप्रकारे सामील करण्यासाठी चीनचे उदाहरण देऊ नका अशा शब्दांत जयशंकर यांनी युरोपीय नेत्यांना फटकारले होते.









