वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात डोहा येथे होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. अंतिम संघात खेळाडूंचा समावेश त्याच्या वैयक्तिक कामगिरीवरच केला जाईल, असे प्रतिपादन भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी केले आहे.
डोहा येथे होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाचा समावेश करण्यात आलेल्या गटामध्ये बलाढ्या ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान आणि सिरीया यांचा समावेश आहे. फिफाच्या मानांकनात ऑस्ट्रेलिया, सिरीया आणि उझबेक हे भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहेत. डोहातील ही स्पर्धा 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय अंतिम संघामध्ये खेळाडूंच्या कामगिरीचा, अनुभवाचा आणि शारीरिक तंदुरूस्तीचा विचार निश्चितच केला जाईल. या स्पर्धेसाठी 26 खेळाडूंची निवड केली जाईल. त्यानंतर भारतीय फुटबॉल संघ शनिवारी प्रयाण करणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 13 जानेवारीला ऑस्ट्रेलियाबरोबर, दुसरा सामना 18 जानेवारीला उझवेक बरोबर तर तिसरा सामना 23 जानेवारीला सिरीया बरोबर खेळविला जाणार आहे.









