वृत्तसंस्था/ कोलंबो
येथे सुरु असलेल्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या सॅफ पुरुषांच्या फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने ब गटातील दुसऱ्या सामन्यात भूतानचा निसटता पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
या स्पर्धेत भारतीय पुरुष फुटबॉल संघाने 2 सामन्यातून 6 गुण वसूल करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. आता भारतीय फुटबॉल संघाचा पुढील सामना पाक संघाबरोबर येत्या सोमवारी खेळविला जाणार आहे. या सामन्यातील विजयी संघ ब गटात आघाडीचे स्थान मिळवेल. भारत आणि भूतान यांच्यातील सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ केला. तसेच त्यांनी परस्परांवर चांगली आक्रमणे केली पण बचावफळी भक्कम असल्याने गोलफलक कोराच राहिला. सामन्यातील 57 व्या मिनिटाला रेहान अहमदने भारताचा एकमेव निर्णायक गोल केला. यानंतर भूतान संघाला शेवटच्या 20 मिनिटात गोल करण्याच्या किमान चार संधी मिळाल्या पण त्या वाया गेल्या. या सामन्यात 27 व्या मिनिटाला भारताला खाते उघडण्याची संधी मिळाली होती. पण के. डोंगेलचा हेडरवरील फटका गोलपोस्टच्या बाहेरुन गेला. दरम्यान 40 व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर शुभम पुनियाला भारताचे खाते उघडता आले नाही. कर्णधार डेनी सिंगने 42 व्या मिनिटाला मारलेला फटका भूतानच्या गोलरक्षकाने व्यवस्थितपणे थोपविला. 84 व्या मिनिटाला भूतानच्या आघाडी फळीतील खेळाडूंना हुलकावणी देत रेहानने मारलेला फटका थोडक्यात हुकल्याने भारतीय संघाला अखेर हा सामना 1-0 अशा अल्पश: फरकाने जिंकता आला.









