वृत्तसंस्था /काठमांडू
नेपाळमध्ये होणाऱ्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारताचा 19 वर्षाखालील पुरुषाचा फुटबॉल संघ येथे दाखल झाला आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना बांगलादेशबरोबर होत आहे. या स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश आहे. भारत, बांगलादेश आणि भुतान हे ब गटात असून यजमान नेपाळ, मालदीव आणि पाकिस्तान यांचा अ गटात समावेश आहे. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सध्याचा 19 वर्षाखालील भारताच्या फुटबॉल संघातील बऱ्याच खेळाडूंचा जन्म 2005 च्या आसपास झाला असून 2021 पासून या संघाला भुवनेश्वरमध्ये सातत्याने प्रशिक्षण दिले जाते. अखेर भारताच्या 19 वर्षाखालील पुरुषांच्या फुटबॉल संघाला पहिल्यांदाच स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. भारताच्या 19 वर्षाखालील युवा फुटबॉल संघाने अलीकडेच सौदी अरेबियाचा दौरा केला आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय संघाला दोन सामने खेळण्याची संधी उपलब्ध झाली. भारतीय संघाला एस. पांडा हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभले आहेत.









