वृत्तसंस्था / बेंगळूर
आगामी होणाऱ्या सिंगापूर विरुद्धच्या आशिया चषक पात्र फेरीच्या फुटबॉल लढतीसाठी प्रमुख प्रशिक्षक खलिद जमील यांनी 23 सदस्यांचा भारतीय फुटबॉल संघ जाहीर केला. या संघात माजी कर्णधार सुनील चेत्री आणि संदेश झिंगन यांचा समावेश करण्यात आला आहे.
41 वर्षीय सुनील चेत्रीने चालू वर्षाच्या प्रारंभी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. पण त्याने हा निर्णय आता मागे घेतला असून तो पुन्हा भारतीय संघातून खेळणार असल्याचे सांगण्यात आले. ऑगस्ट, सप्टेंबर दरम्यान झालेल्या सीएएफए नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेसाठी चेत्रीला विश्रांती देण्यात आली होती. आशिया चषक पात्र फेरीचा क गटातील भारत आणि सिंगापूर यांच्यातील सामना 9 ऑक्टोबरला होणार आहे. भारतीय संघ सिंगापूरला या सामन्यासाठी प्रयाण करणार आहे.
भारतीय संघातील बचावफळीत खेळणारा संदेश झिंगन याला कझाकिस्तानमध्ये 1 सप्टेंबर रोजी झालेल्या सीएएफए नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेतील इराण विरुद्धच्या सामन्यात खेळताना दुखापत झाली होती. आता ही दुखापत पूर्णपणे बरी झाली असून त्यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. सिंगापूर विरुद्ध होणाऱ्या या आगमी सामन्यासाठी भारतीय फुटबॉल संघाकरिता 20 सप्टेंबरपासून बेंगळूरमध्ये सराव शिबिर आयोजित केले होते. आशिया चषक पात्र फेरी स्पर्धेतील भारताचा सिंगापूर बरोबरचा परतीचा सामना 14 ऑक्टोबरला गोव्यातील नेहरु स्टेडियमवर होणार आहे. भारतीय फुटबॉल संघ सोमवारी रात्री उशीरा सिंगापूरला रवाना झाला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत क गटातून शेवटच्या स्थानावर आहे. भारताने दोन सामन्यांतून केवळ 1 गुण मिळविला आहे. या गटात सिंगापूर दोन सामन्यांतून चार गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
भारतीय फुटबॉल संघ: गोलरक्षक-अमरिंदर सिंग, गुरमित सिंग, गुरप्रितसिंग संधू, बचावफळी-अन्वर अली, राल्ते, मोहम्मद युवास, प्रेमवीर, राहुल भेके, संदेश झिंगन, मध्यफळी- ब्रेंडॉन फर्नांडीस, दानिश फारुक भट, दीपक तांगरी, मॅकेरटन निक्सन, महेश सिंग नावोरेम, निखिल प्रभू, सेहल अब्दुल समार, उदांता सिंग कुमाम, आघाडीफळी-फरुक चौधरी. एल. छांगटे, लिस्टन कुलासो, रहीम अली, सुनील चेत्री आणि विक्रम प्रताप सिंग.









