ताजिकिस्तानमध्ये होणार दोन सामने
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2026 आशियाई चषक पात्रता स्पर्धेच्या तयारीकरीता ताजिकिस्तान व कीर्गिझस्तान यांच्याविरुद्ध होणाऱ्या मित्रत्वाच्या सामन्यांसाठी भारताच्या यू-23 पुरुष फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक नौशाद मूसा यांनी सोमवारी 23 सदस्यीय संघाची घोषणा केली असून त्यात तीन वरिष्ठ संघातील खेळाडूंचा समावेश आहे.
1 जूनपासून हा युवा कोलकातील एआयएफएफ राष्ट्रीय सेंटर ऑफ एक्सलंस येथे सराव करीत असून सोमवारी संध्याकाळी हा संघ ताजिकिस्तानला रवाना झाला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये एएफसी यू-23 आशियाई चषक पात्रता स्पर्धा होणार असून त्याच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय 18 जून रोजी ताजिकिस्तानविरुद्ध पहिला सामना त्यानंतर कीर्गिझविरुद्ध 21 जून रोजी सामना खेळणार आहे. दोन्ही सामने ताजिकची राजधानी दुशानबेपासून 25 किमीवर असणाऱ्या हिसॉर येथील हिसॉर सेंट्रल स्टेडियमवर होणार आहेत. आपल्या खेळाडूंची लेव्हल या सामन्यांतून स्पष्ट होणार असल्याचे प्रशिक्षक मूसा म्हणाले. शिबिरात 29 खेळाडूंनी भाग घेतला होता, त्यापैकी 20 जणांना संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय वरिष्ठ संघातून थायलंड व हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यांत सहभागी झाल्यानंतर आघाडीवीर सुहेल अहमद भट, मिडफिल्डर आयुष छेत्री, डिफेंडर तेकचाम अभिषेक सिंग या संघात सामील झाले आहेत.
जूनमध्ये ताजिकिस्तानमध्ये होणाऱ्या फ्रेंडलीजसाठी निवडलेला यू-23 फुटबॉल संघ : गोलरक्षक-मोहम्मद अरबाझ, प्रियांश दुबे, सोहिल. बचावफळी-बिकाश युमनाम, दिपेंदू बिस्वास, मुहम्मद साहीफ एपी, निखिल बार्ला, परमवीर, शुभम भट्टाचार्य, तेकचाम अभिषेक सिंग. मध्यफळी-आयुष छेत्री, चिंगंगबम शिवाल्डो सिंग, लालरेमतलुआंका फनाय, लालरिनलिआना हन्मते, मॅकार्टन लुईस निकसन, मोहम्मद ऐमेन, विबिन मोहनन, विनित वेंकटेश. आघाडी फळी-जोसेफ सनी, मोहम्मद सनन के., पार्थिब सुंदर गोगोई, सुहेल अहमद भट, थिंगुजम कोरू सिंग.









