वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी येथे विद्यमान विजेता आणि यजमान भारत व कुवेत यांच्यात जेतेपदासाठी चुरशीची लढत होणार आहे. भारतीय फुटबॉल संघाने या स्पर्धेत आतापर्यंत आपली मक्तेदारी राखताना आठ वेळा अजिंक्यपद मिळविले असून आता सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली यजमान संघाचे लक्ष्य नवव्या विजेतेपदावर राहिल.
या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी लेबेनॉनने पेनल्टी शूटआऊटपर्यंत लाबविले होते. निर्धारित आणि त्यानंतर ज्यादा वेळेमध्ये गोलफलक कोराच राहिल्याने पंचांनी या सामन्यात पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला आणि भारताने लेबेनॉनचा 4-2 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. मात्र दुसऱ्या उपांत्य सामन्यात कुवेतने बांगलादेशचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. कुवेतला मात्र या एकमेव गोलसाठी जादा वेळेपर्यंत थांबावे लागले होते. या स्पर्धेमध्ये भारताची दुसऱ्यांदा कुवेत बरोबर गाठ पडत आहे. गेल्या आठवड्यात या स्पर्धेतील अ गटातील प्राथमिक सामन्यात कुवेतने भारताला 1-1 असे बरोबरीत रोखले होते.
मंगळवारी येथील कंठीरेवा स्टेडियमवर होणाऱ्या या अंतिम सामन्यावेळी निश्चितच कुवेतच्या तुलनेत भारताचे पारडे किंचित जड वाटते. अंतिम सामन्यामध्ये विजयासाठी भारतीय संघाला सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी करावी लागले. सहाय्यक प्रशिक्षक महेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने या सामन्यासाठी जोरदार सराव केला. संदेश जिनगेनच्या पुनरागमनामुळे भारतीय बचावफळी अधिक भक्कम होईल. लेबेनॉन विरुद्धच्या सामन्यात संदेश जिनगेनला खेळता आले नाही कारण पाक आणि कुवेत विरुद्धच्या सामन्यात जिनगेनला पंचांनी दोन वेळेला पिवळी कार्डे दाखविल्याने त्याच्यावर एक सामन्याची बंदी घालण्यात आली होती. लेबेनॉन विरुद्धच्या सामन्यात जिनगेनच्या जागी अन्वर अलीला खेळविण्यात आले होते. त्याचप्रमाणे भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक स्टिमॅक यांना पाक विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा लाल कार्ड दाखविले होते. तर कुवेत विरुद्धच्या सामन्यातही स्टिमॅक यांना दुसऱ्यांदा लाल कार्ड दाखविल्याने सॅफ स्पर्धेच्या शिस्तपालन समितीने त्यांच्यावर दोन सामन्याची बंदी तसेच 500 अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावला होता. या बंदीच्या निर्णयामुळे स्टिमॅक या स्पर्धेतील अंतिम सामन्यावेळी उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांच्या जागी भारतीय संघाला महेश गवळी यांचे मार्गदर्शन लाभेल.









