वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या 22 मच्छीमारांची सुटका पाकिस्तानने केली आहे. हे मच्छीमार पाकिस्तानच्या कारागृहात होते. पाकिस्तानी नौदलाने त्यांना मासेमारी करताना पकडले होते. हे सर्व मच्छीमार आता गुजरातमध्ये पोहचले आहेत. आपली सुटका झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अद्यापही अनेक मच्छीमार पाकिस्तानच्या कारागृहात असून त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असे आवाहन सुटका झालेल्या मच्छीमारांनी केले आहे.
सुटका करण्यात आलेल्या मच्छीमारांपैकी 18 जण गुजरातचे असून 3 जण दीवचे आहेत. तर एकजण उत्तर प्रदेशातील आहे. या सर्वांना एप्रिल 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत पाकिस्तानने पकडले होते. या मच्छीमारांनी भारताची सागरी मर्यादा ओलांडून पाकिस्तानच्या सागरी मर्यादेत प्रवेश केला होता, असा पाकिस्तानचा आरोप आहे. तथापि, या मच्छीमारांनी तो फेटाळला आहे.
आणखी कितीजण ?
पाकिस्तानच्या कारागृहात आणखी अनेक भारतीय सडत आहेत. अनेक रोगांनी ते जर्जर झाले आहेत. त्यांना योग्य प्रकराचे अन्नही मिळत नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती क्षीण झाली असून त्यांची तेथून लवकर सुटका होणे आवश्यक आहे. सुटका झालेल्या मच्छीमारांनी कारागृहातील या अन्य मच्छीमारांचे एक पत्र केंद्र सरकारला देण्यासाठी आणले आहे. हे पत्र गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग पटेल यांच्याकडे देण्यात आले आहे. या पत्रात त्यांनी त्यांची व्यथा मांडली आहे. पाकिस्तानी कारागृहात त्यांची अवस्था दयनीय झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
किती जणांची सुटका…
2014 पासून डिसेंबर 2024 पर्यंत पाकिस्तानी कारागृहातून 2 हजार 639 भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने संसदेत देण्यात आली होती. जुलै 2024 पर्यंत पाकिस्तानच्या ताब्यात भारताचे 209 मच्छीमार आहेत. त्यांच्यापैकी काही जणांची सुटका करण्यात आली आहे. तथापि, भारत सरकार सर्वांची सुटका करण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तानकडे त्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली असून त्यांची सुटका झाल्याशिवाय केंद्र सरकार स्वस्थ बसणार नाही, असे संसदेत स्पष्ट करण्यात आले.









