भारत हा नेहमीच सांस्कृतिकदृष्टय़ा वैविध्यपूर्ण देश मानला गेला आहे. या देशात हिंदू, मुस्लिम, जैन, शीख, बुद्ध, ख्रिश्चन असे अनेक धर्माचे पालन करणारे लोक राहतात. खरंतर माणसाची संस्कृती आणि संस्कार हे त्याच्या अस्तित्वाचा आणि वंशाचा खूप मोठा भाग आहेत. मानवाने निर्माण केलेल्या संस्कारांचे वैशि÷य़ हेच आहे की त्याची निर्मितीच माणसांना एकत्र आणायला आणि आयुष्य साजरे करायला झाली आहे. कोणत्याही धर्माचा सण असो, त्या दिवशी वातावरणात एक ऊर्जा आणि सकारात्मकता पसरलेली असते, जुने नातेवाईक, मित्र-मैत्रिणी नवीन कपडे घालून एकमेकांना भेटतात आणि त्या दिवशी मानवतेमध्ये एक मजबूत बंधन निर्माण होताना दिसते.
रोजच्या आयुष्यात माणूस नेहमीच बुडालेला असतो. संसार, मुले, घर आणि इतर जबाबदाऱया सांभाळत दिवस निघत असतात. या सगळय़ा गोष्टींचे ओझे खांद्यावर उचलून तो जगत असताना छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा हे विसरतो. भारतीय सण आपल्याला शिकवतात की जीवन साजरे करण्यासाठी आपल्याला मोठय़ा कारणांची गरज नाही.
खरंतर दर वर्षाच्या 1 जानेवारीला ख्रिश्चन समाजाचे नवीन वर्ष सुरू होते, पण सध्या आपण मौजमजेच्या नावाखाली हे ग्रेगोरियन नवीन वर्ष साजरे करतो आणि बरेचदा आपल्या संस्कृतीतील नवीन वर्षाला हवे तेवढे प्राधान्य देत नाही. नवीन वर्ष माणूस नवीन आशेसाठी, आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी करतो. 31 डिसेंबरला सगळे रात्रीपर्यंत जागून मोठमोठय़ा आवाजात गाणी लावून नाचतात. मग ग्रेगोरियन नवीन वर्षाची सुरुवात सकाळी उशिरा उठून, आरामात करतात. आणि या सगळय़ामध्ये मादक पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण अधिक वाढले आहे आणि ते शरीरासोबत समाजासाठीदेखील हानिकारक आहे.
भारतातील संस्कृतींची खास गोष्ट ही आहे की प्रत्येक राज्यात विविध पद्धतीने नवीन वर्ष साजरे केले जाते. उदाहरणार्थ तमिळनाडूमध्ये हिंदू नवीन वर्षाचा आरंभ जानेवारी महिन्यात पोंगल नावाच्या सणाने केला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्र, गुजरातमध्ये गुढी पाडवा, उत्तर भारतात बैसाखी, पूर्वेकडील राज्यात बिहू तर पारसी समाजामध्ये पतेती, अशा अनेक पद्धतीने नवीन वर्ष साजरे केले जाते.
जरी संस्कृती, समाज आणि धर्म वेगळे असले तरी हे सण साजरे करण्यामागचा उद्देश एकच असतो. तो म्हणजे आपण ज्या मातीवर, ज्या भूमीवर राहतो तिला वंदन करणे, निसर्गाने दिलेल्या संसाधनांसमोर कृतज्ञता व्यक्त करणे आणि या सगळय़ामध्ये आपल्या माणसांबरोबर चांगला सकारात्मक वेळ घालवणे.
पण हळूहळू पाश्चिमात्यीकरणामुळे या सणांचे सांस्कृतिक महत्त्व समाजामध्ये कमालीचे कमी झाले आहे. दुर्दैवाने, लोक आता सणांची आतुरतेने वाट पहात नाहीत, ते त्या दिवशी शाळा आणि कार्यालयांना मिळणाऱया सुट्टय़ांची आतुरतेने वाट पाहतात. सण असला तरी आरामात उठतात, कधी कधी संधी साधून फिरायला बाहेर जातात. सणांचा दृष्टिकोन सामाजिक नसून वैयक्तिक झाला आहे. कित्येक तरुणांना त्यांचा समाजातील एखादा सण का साजरा केला जातो हे देखील माहिती नसते. तरुणाई प्रत्येक परंपरेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू लागली आहे. त्यांचा धर्म आणि संस्कृतीकडे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन झाला आहे.
संस्कृती ही काळाप्रमाणे नक्कीच बदलली पाहिजे, पण त्यामागचा इतिहास, आपल्या पूर्वजांनी रचलेली प्रणाली, या गोष्टींकडे कुतूहलाने पाहिले पाहिजे. किंबहुना, आपल्या संस्कृतीकडे कुतूहलाने पहायला तरुण पिढीला शिकवले पाहिजे. खरंतर हे सण मानवाच्या मानसिक आणि सामाजिक कल्याणासाठी अस्तित्वात आहेत.
जर आपण जीवनातील छोटय़ा छोटय़ा गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करू लागलो, तर मनामध्ये नकारात्मक विचार कमी येतील. यामुळे दररोज सकाळी आपल्या मनात आयुष्य जगण्याची आशा निर्माण होते आणि हे सगळय़ांनाच माहिती आहे की मन निरोगी असेल तरच आयुष्य सुखद होते.
वर्षानुवर्षे असलेली यशाची व्याख्या आमूलाग्र बदलली आहे. कारण आजकाल, यशाचे मोजमाप माणसाच्या भौतिक कामगिरीवर केले जाते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी माणूस विचार न करता रोज जो करावा लागेल तो संघर्ष करतो. प्रत्येक धर्म हेच सांगतो की आनंदी जीवनाचे रहस्य म्हणजे आनंदी मन. माणूस जेव्हा आत्मानंदाऐवजी बाह्य गोष्टींमध्ये आनंद शोधू लागतो, तेव्हा ते त्याच्या स्वतःच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी अडसर ठरू शकते.
आजकाल दिवाळी, गणपतीसारख्या सामाजिक सणांमध्ये कर्कश आवाजामध्ये डी जे, अश्लील गाणी आणि मद्यादी वस्तूंचे सेवन अधिक वाढलेले दिसत आहे. क्षणिक सुखासाठी आपण अख्ख्या समाजाला त्रास देतो आहे हेच लोकांना कळत नाही. मग तो सण साजरा करायचा काय फायदा? समाजाला त्रास होईल अशा वागणुकीचे समर्थन केले तर देव खरंच पावणार आहे का याचा विचार सगळय़ांनीच केला पाहिजे.
आपल्या समाजातील सणांकडे पुन्हा एकदा नव्याने बघायला हवे. तरुण पिढीने जुन्या संस्कृती समजून घेऊन, त्याला नवीन सामाजिक दृष्टिकोन दिला पाहिजे. वैयक्तिक दृष्टिकोन बाजूला ठेवून समाजाला पुन्हा एकदा एकत्र आणले पाहिजे. या सगळय़ा सुंदर, विविधरंगी सणांना मानवतेचा स्पर्श मिळणे अतिशय आवश्यक झाले आहे. आजकालच्या काळात यशस्वी असणे गरजेचे आहेच. पण त्याचबरोबर खरा आनंद कुठे आहे हे देखील शोधले पाहिजे. या सणांच्या निमित्ताने थोडीफार जमेल तशी गरजू लोकांचीदेखील मदत केली पाहिजे. कारण जोपर्यंत माणसात माणुसकी आहे तोपर्यंत समाजाची प्रगती होत राहील यात काही वादच नाही.
त्याचबरोबर इतर समाजांमधील, इतर धर्मांमधील, संस्कृतींचा आणि सणांचा आदर ठेवला पाहिजे. सांस्कृतिकदृष्टय़ा वैविध्यपूर्ण असणे ही भारताची सर्वात मोठी शक्ती आहे. या शक्तीची जाण ठेवून माणसाने समाज म्हणून एकत्रित आले पाहिजे. माणसाच्या अस्तित्वाचा एकमेव पुरावा म्हणजे त्याची संस्कृती आहे, हे जाणून घेऊन त्याला कसे जपता येईल याचा विचार केला पाहिजे. येणाऱया पिढीसाठी समाजाची एक सकारात्मक प्रतिमा निर्माण केली पाहिजे. भारतीय सण असो किंवा जागतिक सण, ते मानवी समाजाचे जगाला दिलेले एक वरदान आहे. या वरदानाला हरवण्यापासून थांबवूया. श्राव्या माधव कुलकर्णी








