आर्थिक वर्ष 26 साठी आशियाई विकास बँकेने व्यक्त केला अंदाज
नवी दिल्ली :
पहिल्या तिमाहीत 7.8 टक्क्यांची मजबूत वाढ नोंदवली गेली असली तरी, चालू आर्थिक वर्षात 2025-26 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.5 टक्के दराने वाढू शकते, असा अंदाज आशियाई विकास बँकेने (एडीबी) मंगळवारी व्यक्त केला आहे. एडीबीने म्हटले आहे की, भारतीय निर्यातीवर अमेरिकेच्या कर आकारणीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या अंदाजात, विशेषत: वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत दिसून येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आशियाई विकास बँकेच्या एप्रिल 2025 च्या आशियाई विकास दृष्टिकोन (एडीओ) अहवालात भारताचा आर्थिक विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज होता, परंतु जुलैमध्ये तो 6.5 टक्केपर्यंत कमी करण्यात आला. अमेरिकेच्या कर आकारणीमुळे भारतीय निर्यातीवर होणाऱ्या संभाव्य परिणामाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले.
निर्यातीतील घट जीडीपीवर परिणाम करेल!
पहिल्या तिमाहीत (क्वाटर 1) 7.8टक्के वाढ प्रामुख्याने मजबूत देशांतर्गत वापर आणि सरकारी खर्चामुळे झाली. तथापि, अतिरिक्त अमेरिकन शुल्क निर्यात कमी करेल, ज्यामुळे आर्थिक वर्ष 26 आणि आर्थिक वर्ष 27 च्या दुसऱ्या सहामाहीत आर्थिक वाढीवर परिणाम होईल. निर्यातीतील घट आर्थिक वर्ष 26 आणि आर्थिक वर्ष 27 दोन्हीमध्ये जीडीपी वर परिणाम करेल. परिणामी, निव्वळ निर्यात वाढ अपेक्षेपेक्षा जास्त कमी होऊ शकते. तथापि, जीडीपी वर परिणाम मर्यादित असेल कारण निर्यात जीडीपीमध्ये तुलनेने कमी योगदान देते. शिवाय, इतर देशांना वाढलेली निर्यात, मजबूत सेवा निर्यात आणि देशांतर्गत मागणी यांना वित्तीय आणि चलनविषयक धोरणामुळे चालना मिळेल.
वित्तीय तूट वाढू शकते
एडीओ नूसार, जीएसटी कपातीमुळे कर महसूल कमी झाल्यामुळे आणि खर्चाची पातळी राखण्याची गरज असल्याने चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.4 टक्केच्या बजेट अंदाजापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. तरीही, ती आर्थिक वर्ष 25 मध्ये विक्रमी 4.7 टक्केपेक्षा कमी राहील.
आरबीआय धोरण आणि बँकिंग दर
आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या चार महिन्यात किरकोळ महागाई 2.4 टक्के वर राहिली. यामुळे आरबीआयने मोठी दर कपात लागू केली. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये रेपो दर 25 बेसिस पॉइंट्सने आणि जूनमध्ये 50 बेसिस पॉइंट्सने 5.5 टक्के पर्यंत कमी करण्यात आला.









