वृत्तसंस्था/ चेन्नई
2023 च्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारताचा सलामीचा सामना येथे रविवारी बलाढ्या ऑस्ट्रेलिया बरोबर होणार आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासामध्ये भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी अनेक विक्रम नोंदविले असून सध्याच्या क्रिकेटपटूंना हे विक्रम मोडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने नोंदविलेला 49 शतकांचा विक्रम मागे टाकण्यासाठी आणखी 3 शतके नोंदवावी लागतील.
भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मालाही या स्पर्धेमध्ये नवा विक्रम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने 6 शतकांचा विक्रम केला आहे. हा विक्रम मोडीत काढण्यासाठी रोहित शर्माला आणखी एका शतकाची गरज आहे.
रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विंडीजचा माजी सलामीचा फलंदाज ख्रिस गेलने वनडे क्रिकेटमध्ये 553 षटकारांचा विक्रम केला असून तो अद्याप अबाधित आहे. गेलचा हा विक्रम मागे टाकण्यासाठी शर्माला आणखी 3 षटकारांची गरज आहे.
2023 च्या क्रिकेट हंगामात वनडे क्रिकेटमध्ये सलामीचा नवोदीत फलंदाज शुभमन गिलने सातत्याने धावा केल्या आहेत. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वर्षभराच्या क्रिकेट हंगामात वनडे प्रकारात 1894 धावांचा विक्रम केला आहे. सचिनचा हा विक्रम मागे टाकण्यासाठी गिलला आणखी 665 धावा जमवाव्या लागतील.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासामध्ये भारतातर्फे सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम करण्याची संधी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला लाभली आहे. भारतातर्फे यापूर्वी झहिर खान आणि जवागल श्रीनाथ यांनी या स्पर्धेत प्रत्येकी 44 गडी बाद करण्याचा विक्रम केला असून हा विक्रम मागे टाकण्यासाठी शमीला आणखी 13 बळी मिळविणे गरजेचे आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाला आणखी एक विक्रम करण्याची संधी मिळाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यावेळी या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले तर सदर स्पर्धेचे यजमानपद भूषविताना जेतेपद मिळविण्याचा पहिला विक्रम भारतीय संघ करु शकेल. 2011 साली या स्पर्धेचे यजमानपद भारताने भूषविले होते आणि स्पर्धेचे अजिंक्यपदही मिळविले होते. 2019 ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडने भूषविले होते आणि त्यांनी अजिंक्यपद पटकाविले होते.









