साई किशोर : 12 धावांत 3 बळी, तिलक वर्मा : नाबाद 55
वृत्तसंस्था/ हांगझोऊ, चीन
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या टी-20 क्रिकेट प्रकारात भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा नऊ गड्यांनी दणदणीत पराभव केला. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजयी संघाबरोबर भारताचा सुवर्णपदकासाठी अंतिम सामना होईल.
शुक्रवारच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 20 षटकात 9 बाद 96 धावा जमवल्या. त्यानंतर भारताने 9.2 षटकात 1 बाद 97 धावा जमवत आपला विजय नोंदवला.
बांगलादेशच्या डावामध्ये जाकर अलीने नाबाद 24 तर परवेझ हुसेन इमॉनने 23 धावा केल्या. रकीबुल हसनने 14 धावांचे योगदान दिले. शाबाजने रकीबुलला 17 व्या षटकात तिलक वर्माकरवी झेलबाद केले. या सामन्यात शहबाज अहमदने भारतातर्फे टी-20 प्रकारात आपले पदार्पण केले. भारतीय गोलंदाज साई किशोरने 12 धावात 3 तर वॉशिंग्टन सुंदरने 15 धावात दोन गडी बाद केले. अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, रवी बिस्नोई आणि शहबाज अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावामध्ये कर्णधार गायकवाड आणि तिलक वर्मा यांनी चौकार आणि षटकारावरच अधिक भर देत आपल्या संघाला 64 चेंडू बाकी ठेवून विजय मिळवून दिला. कर्णधार गायकवाडने 26 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 40 तर तिलक वर्माने 26 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 55 धावा झोडपल्या. तिलक वर्माने आपले अर्धशतक केवळ 25 चेंडूत नोंदवले.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 20 षटकात 9 बाद 96 (जाकर अली नाबाद 24, परवेझ हुसेन इमॉन 23, साई किशोर 3-12, वॉशिंग्टन सुंदर 2-15, अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, रवी बिस्नोई, शहबाज अहमद प्रत्येकी एक बळी), भारत 9.2 षटकात 1 बाद 97 (तिलक वर्मा 26 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 55, ऋतुराज 26 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 40).









