वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येत्या सोमवारपासून ब्राझीलमध्ये सुरू होणाऱ्या पहिल्या विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 10 सदस्यांच्या भारतीय पुरुष मुष्टीयुद्ध संघाचे नेतृत्व आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारा नरेंदर बेरवालकडे सोपविण्यात आले आहे.
विश्व मुष्टीयुद्ध फेडरेशनच्या यजमानपदाने पहिल्यांदाज ही स्पर्धा भरविली जात असून गेल्या फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या स्पर्धेला प्राथमिक स्वरुपाची मान्यता दिली होती. 2028 मध्ये लॉस एंजिल्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत वरील क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. ब्राझीलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत पुरुष आणि महिला अशा दोन विविध गटांत लढती होतील. मात्र या स्पर्धेसाठी भारताने केवळ पुरुष मुष्टीयोद्धांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. कारण महिलांची राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धा येत्या गुरुवारी संपणार आहे.
विश्वमुष्टीयुद्ध फेडरेशनने ब्राझीलमधील होणाऱ्या स्पर्धेसाठी नवे वजन गट तयार केले आहेत. त्यामुळे भारतीय स्पर्धक आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच या नवीन वजन गटात सहभागी होत आहेत. गेल्या जानेवारीमध्ये झालेल्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रत्येक वजन गटातील पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरील मुष्टीयोद्धाला ब्राझीलमध्ये आठवडाभराच्या कालावधीसाठी आयोजिलेल्या सराव शिबिराकरिता पाठविण्यात आले आहे. भारताचा विद्यमान राष्ट्रीय विजेता 85 किलो गटातील सुमित हा तंदुरुस्त नसला तरीही तो ब्राझीलच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. त्याच्याकडून बऱ्याच पदकांची अपेक्षा केली जात आहे. मात्र ब्राझीलच्या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये निशांत देव आणि अमित पांगल यांचा समावेश करण्यात आलेला नाही. भारताचे हे दोन मुष्टीयोद्धे आता व्यावसायिक झाले आहेत. अनुभवी मुष्टीयोद्धा शिवा थापा तसेच 2023 च्या विश्वमुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक विजेता दीपक भोरीया यांचा मात्र भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. 80 किलो गटात भारताचे प्रतिनिधीत्व करणारा लक्ष चेहर याचा ब्राझीलमधील स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सलामीची लढत ब्राझीलच्या परेराशी होणार आहे.
ब्राझीलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये 60 किलो गटात सचिन, 90 किलो गटात विशाल यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. आता हे दोघेही उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी लढत देतील. 50 किलो गटात एम. जादुमनी याचा सलामीचा सामना ब्रिटनच्या इलीस ट्रोब्रिजशी होणार आहे. 75 किलो गटात भारताच्या निखिल दुबेला ब्राझीलच्या बेलीनी शी मुकाबला करावा लागणार आहे. कर्णधार नरेंद्रचा 90 किलो वरील वजन गटात सलामीचा सामना कझाकस्थानच्या सिपेरबायशी होणार आहे. 55 किलो गटात मनीषकुमार, 65 किलो गटात अभिनव जमवाल आणि 70 किलो गटात हितेश यांनाही पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. मनीषला ऑस्ट्रेलियाच्या छोटीया किंवा अमेरिकेच्या झेमोरा यांच्याशी दुसऱ्या फेरीत लढत द्यावी लागेल. जमवालचा दुसऱ्या फेरीतील सामना जर्मनीच्या डेनिस ब्रीलशी होईल. ही स्पर्धा सहा दिवस चालणार असून 19 देशांचे सुमारे 130 स्पर्धक सहभागी झाले आहेत. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, कझाकस्थान, अमेरिका, उझ्बेकिस्तान आणि भारत देशांच्या स्पर्धकांमध्ये खरी चुरस राहिल.
भारतीय मुष्टीयुद्ध संघ- एम. जादुमणी (50 किलो), मनीष राठोड (55 किलो), सचिन सीवाच (60 किलो), अभिनेश जमवाल (65 किलो), हितेश (70 किलो), निखिल दुबे (75 किलो), लक्ष चहर (80 किलो), जुगनु (85 किलो), विशाल (90 किलो), नरेंदर बेरवाल (90 किलो वरील गट)









