वृत्तसंस्था / सोलो (इंडोनेशिया)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय कनिष्ठ बॅडमिंटन संघाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. सोमवारी झालेल्या लढतीत माजी विजेत्या जपानने भारताचा 110-104 अशा गुणांनी पराभव केला.
सदर स्पर्धा नव्या गुण पद्धतीनुसार खेळविली जात आहे. या लढतीतील पहिल्या एकेरीच्या सामन्यात भारतीय स्पर्धकाला जपानच्या स्पर्धकांकडून 9-11 अशा गुणांनी थोडक्यात हार पत्करावी लागली. त्यानंतर मुलांच्या दुहेरीच्या सामन्यात भारताच्या भार्गवराम अरिगेला आणि विश्वतेज गोबरु यांनी विजय नोंदविला. दरम्यान भारताच्या विनीला कलागोटला आणि रसिका यांनी मुलींच्या दुहेरीतील सामना जिंकला. या विजयामुळे भारतीय संघाने जपानवर 33-26 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर भव्या छाब्रा आणि रसिका यांनी महिला दुहेरीचा सामना जिंकून जपानवर 44-35 अशी आघाडी मिळविली. या लढतीच्या मध्यंतरापर्यंत भारताने आपले वर्चस्व राखले होते. पण उत्तराधार्थ जपानने सलग पाच सामने जिंकून भारताचे आव्हान समाप्त केले. 2023 साली या स्पर्धेत जपानने विजेतेपद मिळविले होते. आता या स्पर्धेत वैयक्तिक चॅम्पियनशिप सामन्यांना 23 जुलैपासून प्रारंभ होईल.









