वृत्तसंस्था / सोलो (इंडोनेशिया)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या आशियाई बॅडमिंटन कनिष्टांच्या मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाने आपल्या मोहीमेला विजयाने प्रारंभ केला. ड गटातील झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 110-69 असा पराभव केला.
भारत आणि लंका यांच्यातील झालेल्या लढतीत मिश्र दुहेरीच्या प्रकारात भारताच्या विष्णू कोडे आणि रसिका यांनी लंकेच्या केनिथ अरुगोडा आणि इसुरी अत्नायके यांचा 11-5 अशा गुणांनी पराभव केला. त्यानंतर महिला दुहेरीच्या सामन्यात भारताच्या गायत्री आणि मानसा रावत भगिनींनी लंकेच्या अत्नायके आणि सिथुमी डिसिल्वा यांच्यावर 22-14 अशा गुणांनी विजय नोंदविला. कनिष्ट महिलांच्या बॅडमिंटन मानांकनातील टॉप सिडेड भारताच्या तन्वी शर्माने लंकेच्या सिथुली रणशिंगेचा पराभव करुन भारताला 33-21 अशा गुणांची आघाडी मिळवून दिली. या लढतीमध्ये भारतीय संघातील एकाही खेळाडूने 11 गुणांचा रॅलीसचा गेम गमविला नाही. या लढतीतील मध्यंतरापर्यंत भारताने लंकेवर 55-31 अशा गुणांची आघाडी मिळविली होती. आता ड गटातील भारतीय संघाचा पुढील सामना संयुक्त अरब अमिरात बरोबर शनिवारी खेळविला जाणार आहे. भारत हाँगकाँग चायना यांच्यातील सामना रविवारी होणार आहे. या सामन्यानंतर गटातील संघांची स्थिती निश्चित होईल. 2011 साली बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय संघाने कांस्यपदक मिळविले होते. मात्र गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये मलेशियाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताचा 3-2 असा पराभव केल्याने भारताचे पदक थोडक्यात हुकले होते. सोलोमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत एकूण 17 संघांचा समावेश असून ते पाच गटामध्ये विभागण्यात आले आहेत. एका गटामध्ये पाच संघांचा समावेश करण्यात आला आहे. तीन गटामध्ये प्रत्येकी 3 संघांना संधी देण्यात आली आहे. प्राथमिक गट फेरीमध्ये प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर एकदा लढत देईल. त्यानंतर प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. चालु वर्षी या सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत 110 गुणांची रिले पद्धत अवलंबण्यात आली आहे. प्रत्येक लढतीमध्ये एकूण 10 सामने खेळविले जातील. पुरुष आणि महिला एकेरी, पुरुष आणि महिला दुहेरी तसेच मिश्र दुहेरी प्रत्येकी दोन सामने खेळविले जात आहेत. या लढतीमध्ये प्रथम 110 गुण मिळविणाऱ्या संघाला विजयी म्हणून घोषित केले जाईल. तिसऱ्या स्थानासाठी यावेळी प्ले ऑफ सामना राहणार नाही. उपांत्य फेरीत पराभव पत्करणारे दोन्ही संघ कांस्यपदकासाठी पात्र ठरतील.









