वृत्तसंस्था/ सोलो (इंडोनेशिया)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या आशिया कनिष्ठांच्या मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. आता भारत आणि जपान यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल.
ड गटातील झालेल्या शेवटच्या लढतीमध्ये भारताने हाँगकाँग चीनचा 110-100 अशा गुणांनी पराभव करत आघाडीचे स्थान मिळविले. या गटातून भारत आणि हाँगकाँग चीन यांनी यापूर्वीच बाद फेरी गाठली आहे. भारत आणि हाँगकाँग यांच्या लढतीत पहिल्या एकेरीच्या सामन्यात भारताच्या रुजुला रामूने हाँगकाँगचा येयूचा 11-8 असा पराभव केला. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात भारताच्या भार्गवराम अरगीला आणि विश्वा तेज गोबरु यांनी हाँगकाँगच्या शिंग आणि फेई यांचा पराभव करत आपल्या संघाला 22-13 अशी आघाडी मिळवून दिली. पाच सामन्यांनंतर या लढतीत भारताने हाँगकाँगवर 55-49 अशी आघाडी मिळवली होती. मुलींच्या एकेरीतील दुसऱ्या सामन्यात तन्वी शर्माने लियू अॅनाचा पराभव करत आपल्या संघाची आघाडी वाढविली. त्यानंतर उभय संघातील शेवटचे 4 सामने अटीतटीचे झाले. पण भारताने ही लढत अखेर 110-100 अशा गुणांनी जिंकली. भारत आणि जपान यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना सोमवारी होत आहे. जपानने अ गटातून दुसरे स्थान घेतले असून थायलंडने या गटात पहिले स्थान मिळविले आहे.









