वृत्तसंस्था / सोलो (इंडोनेशिया)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या 2025 च्या आशियाई कनिष्ट मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना संयुक्त अरब अमिरातचा (युएई) पराभव केला.
या स्पर्धेत शनिवारी ड गटातील झालेल्या लढतीमध्ये भारताने संयुक्त अरब अमिरातचा 110-83 अशा गुणांनी पराभव करत शेवटच्या 8 संघात स्थान मिळविले. या स्पर्धेत भारताने शुक्रवारच्या पहिल्या लढतीमध्ये लंकेचा पराभव केला होता. ड गटातून हाँगकाँग संघाने आपल्या दोन्ही लढती जिंकल्याने आता या गटातून भारत आणि हाँगकाँग यांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. ड गटात रविवारी भारत आणि हाँगकाँग यांच्यात आघाडीच्या स्थानासाठी लढत होईल.
सदर सांघिक स्पर्धा नव्या गुणपद्धतीच्या फॉर्मेटमध्ये खेळविली जात आहे. 10 सामन्यांतून 110 गुण मिळविण्यासाठी प्रत्येक संघाचे प्रयत्न चालु असतात. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील झालेल्या लढतीतील पहिल्या महिलाच्या एकेरी सामन्यात भारताच्या रुजुला रामुने संयुक्त अरब अमिरातच्या मायशा खानचा 11-5, त्यानंतर मिश्र दुहेरीच्या सामन्यात तारीनी सुरी व सी. लालरेमा सेंघा यांनी भारताला 22-11 अशी आघाडी मिळवून दिली. या लढतीतील मध्यंतरापर्यंत भारताने संयुक्त अरब अमिरातवर 55-41 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर महिला एकेरीच्या सामन्यात भारताच्या तन्वी शर्माने आपल्या संघाला 66-46 अशा गुणांनी आघाडीवर नेले. दुसऱ्या मिश्रु दुहेरच्या सामन्यात लालरेम शेंगा आणि रसिका यांनी आदित्य किरण व मायशा खान यांचा 11-5 असा पराभव करत भारताला 77-51 अशी आघाडी मिळवून दिली. गेल्या वर्षी या स्पर्धेत भारताला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मलेशियाकडून पराभव पत्करावी लागल्याने भारताचे पदक थोडक्यात हुकले हाते. या स्पर्धेमध्ये एकण 17 संघांचा समावेश आहे.









