वृत्तसंस्था/नवी दिल्ली
प्रत्येक वर्षीच्या अॅथलेटिक्स हंगामामध्ये विविध ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर अॅथलेटिक्स स्पर्धा नियमीतपणे घेतल्या जातात. आता 2025 च्या अॅथलेटिक हंगामामध्ये पहिली राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा फेडरेशन चषक नावाने घेतली जाते. आता देशातील अॅथलिटस्ना फेडरेशन चषक अॅथलेटीक्स स्पर्धेपूर्वी ग्रां प्री दर्जाच्या किमान एका स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची सक्ती करण्यात आली आहे. 27 ते 31 मे दरम्यान कोरियामध्ये आशियाई चॅम्पियनशिप अॅथलेटिक्स स्पर्धा घेतली जणार असून या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी भारतीय संघाकडून होण्याच्या दृष्टिकोनातून
अॅथलेटिक फेडरेशनने ही सक्ती लागू केली आहे. आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेवूनच केली जाईल. फेडरेशन चषक अॅथलेटिक स्पर्धा 21 ते 24 एप्रिल दरम्यान केरळमधील कोची येथे होणार आहे. अखिल भारतीय अॅथलेटिक फेडरेशनतर्फे देशातील काही अॅथलिट्सना विदेशात प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. भारताचा दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेक धारक निरज चोप्राला मात्र फेडरेशनच्या या सक्तीमधून वगळण्यात आले आहे.
फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही राज्यातील अॅथलिटला देशात होणाऱ्या किमान एका राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये सहभागी होणे जरुरीचे आहे. 2025 च्या अॅथलेटिक हंगामात भारतीय खुली अॅथलेटिक्स स्पर्धा पंजाब, गुजरात, झारखंड, तामिळनाडूमध्ये भरविल्या जातात. तसेच चौथी इंडियन खुली थ्रोबॉल स्पर्धा, चौथी इंडियन खुली उंचउडी, लांबउडी स्पर्धा, सहावी इंडियन खुली 400 मी. धावणे- इंडियन ग्रां प्री स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. फेडरेशन चषक, राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक चॅम्पियशिप स्पर्धा तसेच राष्ट्रीय खुली चॅम्पियनशिप स्पर्धा यासारख्या प्रमुख स्पर्धांकरिता भारतीय अॅथलेटिक फेडरेशनतर्फे अॅथलिट्सच्या प्रवेशासाठी ठराविक दर्जा ठेवला आहे. यावर्षीच्या अॅथलेटिक हंगामात अॅथलेटिक फेडरेशनतर्फे 8 इंडियन खुल्या अॅथलेटिक स्पर्धा देशातील विविध शहरांमध्ये घेतल्या जातील.









