सात खिडक्या असलेल्या कपोलामधून फोटोशूट : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नऊ दिवस पूर्ण
वृत्तसंस्था/ टेक्सास
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (आयएसएस) काढलेले नवीन फोटो रविवारी सोशल मीडियाद्वारे समोर आले आहेत. यामध्ये शुभांशू आयएसएसच्या विशेष खिडकी ‘कपोला’मधून पृथ्वी पाहताना दिसत आहे. आयएसएसमधील कपोला मॉड्यूलला सात खिडक्या असून त्यातून तो पृथ्वीची पाहणी करत असल्याचे दिसत आहे. काही फोटोंमध्ये शुभांशू पृथ्वीचे फोटो काढतानाही दिसत आहे. हे सर्व फोटो इस्रोने रविवारी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
भारतीय हवाई दलाच्या ग्रुप कॅप्टन शुभांशूसह 4 अंतराळवीरांनी 25 जून रोजी केनेडी स्पेस सेंटरवरून उ•ाण केले. सुमारे 28 तासांच्या प्रवासानंतर ते 26 जून रोजी आयएसएसवर पोहोचले. आता शुभांशू आयएसएसवर जाऊन 9 दिवस झाले आहेत. शुभांशू शुक्ला हा आयएसएसवर पोहोचणारा पहिला भारतीय आणि अंतराळात जाणारा राकेश शर्मा यांच्यानंतरचा दुसरा भारतीय अंतराळवीर ठरला आहे.
अंतराळात हाडांवर संशोधन
शुभांशू यांनी अंतराळ स्थानकात असताना हाडांशी संबंधित एक अभ्यासपूर्ण संशोधन केले आहे. हे संशोधन हाडांच्या आजाराच्या ऑस्टियोपोरोसिसवर चांगल्या उपचारांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. शनिवारी, शुभांशू आणि अॅक्सिओम-4 मोहिमेतील इतर अंतराळवीरांनी शून्य गुरुत्वाकर्षण किंवा सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात हाडांवर कसा परिणाम होतो हे शोधण्याचा प्रयत्न केला. अंतराळात हाडे कशी खराब होतात आणि पृथ्वीवर परतल्यावर ती कशी बरी होतात यासंबंधीचा सूक्ष्म अभ्यास त्यांच्याकडून केला जात आहे.
अन्य प्रयोगही प्रगतीपथावर
शुभांशू आयएसएसमध्ये जवळपास 14 दिवस वास्तव्य करणार आहे. या काळात तो भारतीय शिक्षण संस्थांचे 7 प्रयोग करणार आहे. यापैकी बहुतेक जैविक अभ्यास आहेत. तसेच नासासोबत इतर 5 प्रयोग करणार आहे. त्यामध्ये दीर्घ अंतराळ मोहिमांसाठी डेटा गोळा केला जाईल. हे सर्व प्रयोग सध्या प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. या मोहिमेत केलेले प्रयोग भारताच्या गगनयान मोहिमेला बळकटी देतील, असा आशावाद इस्रोने व्यक्त केला आहे.









