वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडियन अॅरोज कनिष्ठ महिला संघ 2024-25 इंडियन वुमेन्स लीग 2 (आयडब्ल्यूपीएल 2) मध्ये स्वीडनचे प्रमुख प्रशिक्षक जोआकिम अलेक्झांडरसन यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी होणार आहे.
इंडियन अॅरोज कनिष्ठ महिला संघाचा या लीगमध्ये ब गटात समावेश असून बुधवारी बेंगळूरमध्ये त्यांचा पहिला सामना पुधुवाइ युनिकॉर्न्स यांच्याविरुद्ध होणार आहे. आयडब्ल्यूएल 2 मधील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण इंडियन फुटबॉल यू ट्युब चॅनेलवरून केले जाणार आहे. ‘या खेळाडूंना ट्रेनिंगची चांगली संधी मिळावी आणि प्रत्यक्ष सामन्यात खेळण्याचा अनुभव मिळावा हा यामागचा उद्देश आहे,’ असे अलेक्झांडरसन म्हणाले. स्पोर्ट्स स्कूल बेंगळूर येथे ते या मुलींना मार्गदर्शन करीत आहेत. ‘आम्ही चांगली तयारी केली असून खेळाडूंची व त्यांच्या क्षमतेची चांगली ओळखही झाली आहे. मुलांच्या युवा संघाविरुद्ध एक सराव सामनाही या मुलींनी खेळला आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
वरिष्ठांच्या आयडभ्ल्यूएल 2 मध्ये देशभरातील अनेक संघांनी भाग घेतला असल्याने त्यांच्याविरुद्ध खेळण्याचा सरासरी 15 वय असणाऱ्या या मुलींना चांगला अनुभव मिळणार आहे. येत्या सप्टेंबरमध्ये सॅफ यू-17 महिला चॅम्पियनशिप आणि एएफसी यू-17 महिला आशियाई कप 2026 पात्रता स्पर्धा ऑक्टोबरमध्ये होणार आहे, त्याची चांगली तयारी या लीगमध्ये खेळल्याने होणार आहे. यापूर्वी 2021-22 आयडब्ल्यूएल मोसमातही इंडियन अॅरोज संघाला खेळविण्यात आले होते आणि त्यांनी पाचवे स्थान मिळविले होते. त्याआधी राष्ट्रीय महिला लीगमध्येही त्यांना खेळविण्यात आले होते.
आयडब्ल्यूएल 2 मध्ये इंडियन अॅरोजचे पुढील सामने इंटर काशी (4 एप्रिल), रूट्स एफसी (7 एप्रिल), कासा बरवानी एससी (9 एप्रिल) यांच्याशी होणार आहेत. गटात अव्वल दोन स्थाने मिळविणारे संघ सहा संघांच्या फायनल राऊंडमध्ये खेळतील गोव्यामध्ये हे सामने होणार आहेत.
आयडब्ल्यूएल 2 मध्ये सहभागी होणारा इंडियन अॅरोजचा 26 सदस्यीय संघ : गोलरक्षिका : खुशी, कोनजेन्गबम ताम्फासना देवी, मुन्नी, सुरजमुनी कुमारी. बचाव फळी : अमृता घोष, दिव्यानी लिंडा, एलिझाबेद लाक्रा, प्रिया, रुपश्री मुंडा, तमन्ना, विकसित बारा. मध्य फळी : अभिष्टा बासनेत, अनिता डुंगडुंग, अनुष्का कुमारी, हरमीन कौर, जुलन नॉन्गमैथेम, लिपी किशन, तोनामाबम तानिया देवी. आघाडी फळी : दीपिका कुमारी, गुरलीन कौर, गुरनाझ कौर, खुशबू, निशा, रीमा कुमारी, श्वेता राणी, वलैना जदा फर्नांडिस. मुख्य प्रशिक्षक : जोआकिम अलेक्झांडरसन, साहायक प्रशिक्षक : निवेथा रामदास, गोलरक्षक प्रशिक्षक : हमीद केके.









