व्हाइट हाउस परिसरात ट्रकद्वारे दिली धडक
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
एका 19 वर्षीय भारतीय वंशाच्या युवकाला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. या युवकाने व्हाइट हाउसनजकी लावण्यात आलेल्या बॅरियर्सला ट्रकद्वारे धडक दिली होती. आरोपीचे नाव साई वरशिथ कंडुला असून त्याने काही आक्षेपार्ह वक्तव्ये देखील केली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना नुकसान पोहोचविण्याचा त्याचा प्रयत्न होता असे सांगण्यात येत आहे.
बिडेन यांची हत्या करण्याकरता या युवकाने व्हाइट हाउसमध्ये ट्रक घुसविण्याचा प्रयत्न केला होता. लाफयेत पार्कच्या उत्तर दिशेला असलेल्या सुरक्षा बॅरियर्सवर त्याने ट्रक चढविला. व्हाइट हाउसच्या गेटनजीक ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील हॉटेल रिकामी करवावे लागले आहे. परंतु या घटनेत कुणीच जखमी झालेले नाही. आरोपी कंडुला हा अमेरिकेच्या मिसौरी येथील चेस्टरफील्डचा रहिवासी आहे. कंडुलाने हा ट्रक सोमवारी रात्री भाडेतत्वावर प्राप्त केला होता.
मागील 6 महिन्यांपासून हल्ल्याचा कट रचत होता. व्हाइट हाउसमध्ये शिरून, सत्ता हिसकावत देशाचा प्रभारी होण्याचा कट होता असे त्याने अटकेनंतर अधिकाऱ्यांना सांगितले आहे. अध्यक्षांना ठार करत वाटेत येणाऱ्या लोकांना ईजा पोहोचविण्याचा प्लॅन होता असेही त्याने चौकशीदरम्यान सांगितले आहे.









