वृत्तसंस्था / जमशेदपूर
ड्युरँड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या क गटातील सामन्यात इंडियन आर्मी संघाने त्रिभुवन आर्मीचा 1-0 अशा गोल फरकाने निसटता पराभव केला.
हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा ठरला. इंडियन आर्मीतर्फे एकमेव निर्णायक गोल खेळाच्या पूर्वाधार्थ पी. ख्रिस्टोफर केमीने नोंदविला. या सामन्यात त्रिभुवन आर्मीला 10 खेळाडूनीशी खेळावे लागले. या पराभवामुळे त्रिभुवन आर्मी एफसी संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. क गटामध्ये त्रिभुवन आर्मीला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले. या सामन्यात इंडियन आर्मी संघाला विजयाची नितांत गरज होती. इंडियन आर्मीने या स्पर्धेत दोन सामन्यांतून तीन गुण मिळविले आहेत तर त्रिभुवन आर्मीला केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले. सामना सुरू झाल्यानंतर 21 व्या मिनिटाला इंडियन आर्मीचे खाते पी. ख्रिस्टोफर केमीने उघडले. ख्रिस्टोफरचा हा फटका त्रिभुवन आर्मीच्या गोलरक्षकाला थोपवता आला नाही. मध्यंतरापर्यंत इंडियन आर्मीने 1-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्यातील 29 व्या मिनिटाला त्रिभुवन आर्मीचा गोलरक्षक विकास कुथूला पंचांनी लालकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. त्यामुळे या संघाला शेवटपर्यंत दहा खेळाडूनीशी खेळावे लागले. या सामन्यात इंडियन आर्मीला तीन गुण मिळाले.









