संरक्षण मंत्रालयाला पाठविला प्रस्ताव : 48 किलोमीटरचा मारक पल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सैन्याने संरक्षण मंत्रालयाला 400 हॉवित्झर तोफा खरेदीचा प्रस्ताव पाठविला आहे. या खरेदीकरता 6 हजार 500 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पूर्णपणे स्वदेशी या तोफांची निर्मिती डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)ने केली आहे. केंद्र सरकारकडून बोलाविल्या जाणाऱ्या एका उच्चस्तरीय बैठकीत हॉवित्झर तोफांच्या खरेदीवर निर्णय घेतला जाणार आहे. जुन्या तोफांपेक्षा नव्या तोफा वजनाच्या दृष्टीकोनातून अत्यंत हलक्या असणार आहेत.

हॉवित्झर तोफांमधून डागण्यात आलेल्या गोळ्यांची रेंज 48 किलोमीटर इतकी असणार आहे. तर बोफोर्स तोफ 32 किलोमीटर अंतरापर्यंत तोफगोळे डागू शकते. हॉवित्झर तोफ ही 155 एमएमच्या श्रेणीत जगात सर्वाधिक अंतरापर्यंत तोफगोळे डागण्यास सक्षम आहे. ही तोफ उणे 30 अंश सेल्सिअसपासून 75 अंश सेल्सिअसच्या तापमानातही अचूक फायर करू शकते.
या तोफेच्या 26.44 फूट लांब बॅरलमधून दर मिनिटाला 5 तोफगोळे डागले जाऊ शकतात. यात ऑटोमॅटिक रायफलप्रमाणे सेल्फ लोडेड सिस्टीम देखील आहे. या तोफेतून अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी थर्मल साइट सिस्टीमचा अंतर्भाव करण्यात आला आहे. म्हणजेच ही तोफ रात्रीच्या वेळी देखील अचूक निशाणा साधू शकते. याचबरोबर यात वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम देखील बसविण्यात आली आहे.
एटीएजीएस
या तोफेचे नाव अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम आहे, म्हणजेच ही तोफ ट्रकद्वारे देखील खेचली जाऊ शकते. एटीएजीएसला हॉवित्झर देखील म्हटले जाते. हॉवित्झर म्हणजे छोट्या तोफा. दुसरे महायुद्ध आणि त्यानंतरच्या युद्धात मोठ्या अन् अवजड तोफांचा वापर केला जात होता. परंतु या तोफांना दीर्घ अंतरावर तसेच उंच ठिकाणी नेणे अवघड ठरायचे. याचमुळे हलक्या अन् छोट्या तोफा निर्माण करण्यात आल्या, ज्यांना हॉवित्झर म्हटले गेले.
डीआरडीओकडून निर्मिती
ही तोफ डीआरडीओच्या पुण्यातील एआरडीई या लॅबने भारत फोर्ज लिमिटेड, महिंद्रा डिफेन्स नेव्हल सिस्टीम, टाटा पॉवर स्ट्रॅटेजिक आणि ऑडिनेन्स फॅक्ट्री बोर्डाने विकसित केली आहे. 2013 मध्ये या तोफेच्या निर्मितीवर काम सुरू झाले होते आणि पहिले यशस्वी परीक्षण 14 जुलै 2016 रोजी पार पडले होते. या तोफेची वैशिष्ट्यो बोफोर्स तोफेशी मिळतीजुळती असल्याने याला देशी बोफोर्स असेही म्हटले जाते.
सैन्याच्या सूचनेवर अंमलबजावणी
2018 मध्ये संरक्षण अधिग्रहण परिषदेने 3,365 कोटी रुपयांच्या अनुमानित खर्चावर 150 एटीएजीएस तोफांच्या खरेदीला मंजुरी दील होती. सैन्याला या श्रेणीत 1,580 आर्टिलरी गन्सची गरज होती. सैन्याच्या तोफांच्या अधिक वजनावरून आक्षेप नोंदविला होता. एटीएजीएसचे वजन सुमारे 18 टन असावे अशी सैन्याची इच्छा होती. याचमुळे यावर काम करत सैन्याची मागणी पूर्ण करण्यात आली.









