वृत्तसंस्था/ मेडेलिन (कोलंबिया)
येथे मंगळवारपासून सुरू होत असलेल्या 2023 च्या विश्वचषक तिरंदाजी स्टेज 3 स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाचे नेतृत्व ज्योती सुरेखा व्हेन्नमकडे सोपविण्यात आले आहे.
विश्व चॅम्पियनशिप तिरंदाजी स्पर्धेत ज्योती सुरेखा व्हेन्नमने रौप्यपदक पटकावले होते. कोलंबियात सुरू असलेल्या स्पर्धेसाठी 16 सदस्यांचा तिरंदाजी संघ सहभागी झाला असून त्यात 8 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. भारताचा अनुभवी ऑलिम्पियन तिरंदाजपटू तरुणदीप राय या स्पर्धेत सहभागी होत आहे तर अतानू दासला ही स्पर्धा हुकली आहे. या स्पर्धेसाठी मे महिन्यात सोनेपत येथे अखिल भारतीय तिरंदाजी संघटनेने निवड चाचणी स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेतील कामगिरीवरच तिरंदाजपटूंची निवड करण्यात आली होती. भारताच्या तुषार शेळके आणि मृणाल चव्हाण यांनी अतानू दास आणि नीरज चौहान यांना मागे टाकत भारतीय संघात स्थान मिळवले आहे. पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकरात धीरज बोमादेवरा याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुर्कीमध्ये अलीकडेच झालेल्या विश्व चषक तिरंदाजी स्टेज वन स्पर्धेत 21 वर्षीय धीरज बोम्मदेवराने पुरुषांच्या सांघिक रिकर्व्ह तसेच वैयक्तिक प्रकारात रौप्य आणि कांस्यपदक मिळवले होते.
कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात महिलांच्या विभागात भारताच्या ज्योती सुरेखा व्हेनामकडून पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या चालू वर्षामध्ये यापूर्वी झालेल्या विविध स्टेजीसमध्ये ज्योती सुरेखा आणि ओजस प्रवीण देवतळे यांनी मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते. ज्योती सुरेखाने या क्रीडा प्रकारात दर्जेदार कामगिरी करत विश्व विक्रमाशी बरोबरी साधली होती. भारताच्या पुरुष संघामध्ये अभिषेक वर्माचे पुनरागमन झाले आहे. अभिषेक वर्माने यापूर्वी दोनवेळा विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक गटात दोनवेळा सुवर्णपदके मिळवली होती. शांघायमध्ये झालेल्या स्पर्धेत वैयक्तिक गटात सुवर्णपदक मिळवणारा प्रथमेश जावकर याचाही संघात समावेश आहे. अँटेलिया येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी चार पदकांची तर शांघायमधील स्पर्धेत तीन पदकंची कमाई केली आहे. कोलंबियात सुरू होत असलेल्या या स्पर्धेत वैयकितक गटात सुवर्णपदके मिळवणारे तिरंदाजपटू मेक्सिकोत येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. ]़]़









