वृत्तसंस्था / माद्रिद
येथे सुरू झालेल्या विश्वचषक स्टेज 4 तिरंदाजी स्पर्धेत शनिवारी भारतीय तिरंदाजपटूंनी तीन पदकांची कमाई केली. महिलांच्या विभागात भारताच्या ज्योती सुरेखा व्हेनामने परणीत कौर व 16 वर्षीय प्रतिका प्रदीप समवेत सांघिक कंपाऊंड प्रकारात रौप्य पदक पटकाविले.
महिलांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातील पात्र फेरीमध्ये भारताच्या ज्योती परणीत आणि प्रतिका यांनी 2116 गुण नोंदविले. त्यानंतर सुवर्णपदकाच्या फेरीमध्ये चीन तैपेईने भारताला केवळ दोन गुणांनी मागे टाकत सुवर्णपदक पटकाविले. चीन तैपेईच्या स्पर्धकांनी भारताचा 227-225 अशा गुणांनी पराभव केला. भारतीय तिरंदाजपटूंना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत ऋषभ यादव आणि ज्योती सुरेख व्हेनाम यांनी मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक मिळविताना एल. साल्वाजोरच्या कोराडो आणि नोलास्को यांचा 156-153 अशा गुणांनी पराभव केला. ज्योती व्हेनामने या स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात रौप्य पदक पटकाविले. कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात ब्रिटनच्या गिब्सनने ज्योतीचा 148-147 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव करत सुवर्णपदक घेतले. ज्योतीला रौप्य पदक मिळाले









