विंडीजचा सात गड्यांनी पराभव, सूर्यकुमार, तिलक वर्मा यांची दमदार फलंदाजी, कुलदीप यादवचे 3 बळी
वृत्तसंस्था/ प्रोव्हिडन्स
मंगळवारी येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने यजमान विंडीजचा 13 चेंडू बाकी ठेवून सात गड्यांनी पराभव करत आपले आव्हान जिवंत ठेवले. या मालिकेत विंडीजने भारतावर 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. यजमान विंडीजने भारताला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 20 षटकात 5 बाद 159 धावा जमवल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताने 17.5 षटकात 3 बाद 164 धावा करत विजय नोंदवला. सूर्यकुमारला सामनावीराचा बहुमान देण्यात आला.

या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. किंग आणि मेयर्स या सलामीच्या जोडीने 7.4 षटकात 55 धावांची भागीदारी केली. विंडीजचे अर्धशतक 42 चेंडूत फलकावर लागले. आठव्या षटकातील चौथ्या चेंडूवर अक्षर पटेलने मेयर्सला अर्शदीप सिंगकरवी झेलबाद केले. त्याने 20 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 25 धावा जमवल्या. हार्दिक पंड्याने कुलदीप यादवकडे चेंडू सोपवला. कुलदीपने चार्ल्सला पायचित केले. कुलदीपने विंडीजला आणखी एक धक्का देताना पुरनला यष्टीरक्षक सॅमसनकरवी यष्टीचित केले. त्याने 12 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 20 धावा जमवल्या. विंडीजचे शतक 82 चेंडूत फलकावर लागले. कुलदीपने स्वत:च्याच गोलंदाजीवर किंगला टिपले. त्याने 42 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 42 धावा जमवल्या.
सूर्यकुमारची फटकेबाजी
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावाला नेहमीप्रमाणे चांगली सुरुवात झाली नाही. या सामन्यात इशान किसनच्या जागी संधी देण्यात आलेला सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वाल पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर झेलबाद झाला. गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या गड्यासाठी 28 धावांची भर घातली. विंडीजच्या जोसेफने गिलला चार्ल्सकरवी झेलबाद केले. गिलने 11 चेंडूत 1 चौकारासह 6 धावा जमवल्या. भारताने पॉवरप्लेच्या 6 षटकात 60 धावा जमवताना दोन गडी गमवले होते. भारताचे अर्धशतक 34 चेंडूत फलकावर लागले.
सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांनी विंडीजच्या गोलंदाजीवर समयोचित फटकेबाजी करत आपल्या संघाला विजयाच्या समीप नेले. या जोडीने 50 चेंडूत 85 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने आपले अर्धशतक 23 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने झळकवले. या जोडीने अर्धशतकी भागीदारी 28 चेंडूत नोंदवली. 10 षटकाअखेर भारताने 2 बाद 97 धावापर्यंत मजल मारली होती. भारताचे शतक 65 चेंडूत नोंदवले गेले. सूर्यकुमार शतक झळकवेल असे वाटत असतानाच जोसेफने त्याला सीमारेषेवर किंगकरवी झेलबाद केले. सूर्यकुमारने 44 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकारांसह 83 धावा तडकावल्या. सूर्यकुमार बाद झाला त्यावेळी विजयासाठी भारताला 39 धावांची जरुरी होती. तिलक वर्मा आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. वर्मा 49 धावांवर नाबाद राहिला.
तिलक वर्मा आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. तिलक वर्माने 37 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 49 धावा झळकवल्या. हार्दिक पंड्याने पॉवेलच्या गोलंदाजीवर विजयी षटकार खेचला. त्याने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 20 धावा जमवल्या. भारताच्या डावात 6 षटकार आणि 16 चौकार नोंदवले गेले.
तसेच अवांतराच्या रुपात 5 धावा मिळाल्या. विंडीजतर्फे जोसेफने 2 तर मॅकॉयने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 20 षटकात 5 बाद 159 (किंग 42 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 42, मेयर्स 1 षटकार आणि 3 चौकारासह 20 चेंडूत 25, चार्ल्स 1 षटकार आणि 1 चौकारासह 12, पुरन 12 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 20, पॉवेल 19 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 40, हेटमायर 1 चौकारासह 9, शेफर्ड नाबाद 2, अवांतर 9, कुलदीप यादव 3-28, अक्षर पटेल 1-24, मुकेशकुमार 1-19).
भारत 17.5 षटकात 3 बाद 164 (जैस्वाल 1, गिल 6, सूर्यकुमार यादव 44 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकारांसह 83, तिलक वर्मा 37 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 49, हार्दिक पंड्या 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 20, अवांतर 5, जोसेफ 2-25, मॅकॉय 1-32).









