ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रांची येथे झाला. मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ९ धावांनी पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेत भारताने दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर तब्बल सात गडी राखून विजय मिळवला. आजच्या विजयाने भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचे 279 धावांचे आव्हान 7 गडी राखून पार करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताकडून श्रेयस अय्यरने नाबाद शतकी (११३) खेळी केली. तर इशान किशनने ८४ चेंडूत ९३ धावांची आक्रमक खेळी करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १६१ धावांची दमदार भागीदारी रचली. गोलंदाजीत मोहम्मद सिराजने भेदक मारा करत ३ विकेट्स घेतल्या. आफ्रिकेकडून एडेन माक्ररम ७९ तर रीझा हेंड्रिक्सने ७४ धावांची खेळी केली. मिलरने ३४ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची जबाबदारी केशव महाराज सांभाळत आहे. श्रेयस अय्यरने विजयी धाव काढत सामना भारताच्या नावावर केला. तर श्रेयस अय्यर सामनावीरचा मानकरी ठरला.
दरम्यान. २७९ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात देखील निराशाजनक झाली. कर्णधार शिखर धवनने फक्त १३ धावा केल्या. सलामीवीर शुबमन गिल आणि धवन बाद झाल्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांमध्ये तब्बल दीडशतकी भागीदारी झाली. त्यांच्यात १६१ धावांची भागीदारी झाली. ईशानचे शतक सात धावांनी हुकले. मात्र श्रेयस अय्यरने आपले दुसरे शतक पूर्ण केले. त्याने १११ चेंडूत ११३ धावांची दमदार खेळी केली. दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी आज फार चांगली झाली नाही. दव जास्त पडल्याने आफ्रिकन गोलंदाजांना चेंडू फेकण्यात अडचणी येत होत्या. वेगवान गोलंदाज ब्योर्न फॉर्च्युइन, वेन पारनेल आणि कगिसो रबाडा या तिघांनी मिळून १– १ गडी बाद केला. फिरकीपटू मात्र अपयशी ठरले.









