लेबनॉनवर अंतिम सामन्यात 2-0 ने विजय, कर्णधार सुनील छेत्री व छांगटेकडून गोलांची नोंद
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
कर्णधार सुनील छेत्रीने नोंदविलेल्या त्याच्या 87 व्या आंतरराष्ट्रीय गोलाच्या बळावर येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने लेबनॉनवर 2-0 असा विजय मिळवत इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकला. लल्लियानझुआला छांगटे याने दुसरा गोल नोंदविताना प्रभावी प्रदर्शन घडविले.
2018 मधील शुभारंभी स्पर्धेनंतर भारताचे हे स्पर्धेतील दुसरे विजेतेपद आहे. 2019 मध्ये कोरियाने विजय मिळवला होता. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या 38 वर्षीय छेत्रीने 46 व्या मिनिटाला गोल केला. विजेतेपदासाठीच्या या लढतीत पहिल्या सत्रामध्ये गोलशून्य बरोबरी कायम राहिल्यानंतर दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला असता लगेचच छेत्रीने कोंडी फोडली.
कलिंगा स्टेडियमवर जवळपास पूर्ण क्षमतेने उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांचा पाठिंबा लाभलेल्या भारताने या आघाडीच्या जोरावर आपले स्थान बळकट केले. त्यानंतर पहिल्या गोलसाठी चेंडू पुरविणाऱ्या लल्लियानझुआला छांगटे याने 66 व्या मिनिटाला लक्ष्य भेदून चाहत्यांच्या आनंदात भर घातली आणि त्यांच्या विश्वातील 99 व्या क्रमांकावरील प्रतिस्पर्ध्याला स्तब्ध करून टाकले.
उष्ण आणि दमट वातावरणात खेळताना दोन्ही संघांना पूर्वार्धात गोल नोंदविण्याच्या बऱ्याच संधी प्राप्त झाल्या होत्या. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या त्यांच्यातील सामन्यात जसे दर्शन घडले होते त्याचप्रमाणे या सामन्यातही चित्र पाहायला मिळून सदर संधींचा त्यांचा उपयोग करता आला नाही. भारताचा चेंडूवर अधिक ताबा रहिलेला असला (जवळपास 58 टक्के), तरी लेबनॉनच्या संघाने भारताच्या गोलच्या दिशेने सात फटके हाणले, तर भारतीय संघाला केवळ तीन असे फटके हाणता आले. त्यामुळे गोल नोंदविण्याच्या बाबतीत भारताचा कच्चा दुवा स्पष्टपणे दिसून आला.
मात्र मध्यांतरानंतर सगळे बदलले. प्रथम छांगटेने गोलक्षेत्रात प्रवेश केला आणि छेत्रीस चेंडू पुरविला. छेत्रीने लेबनीज गोलरक्षक अली साबेहच्या मागे शांतपणे चेंडू सरकावून गोलाची नोंद केली. या चालीची सुरुवात निखील पुजारीने करताना छांगटेला अगदी कमी जागेतून चेंडू पुरविण्यात यश मिळविले. भारतीयांनी या आघाडीचा फायदा उठवत दबाव वाढविण्यस सुरुवात केली आणि त्यांना छांगटेच्या माध्यमातून दुसरा गोल करण्यात यश आले.
यावेळी छेत्रीकडून चेंडू मिळाल्यानंतर बदली खेळाडू नौरेम महेश सिंगने लेबनीज गोलरक्षकाला चकविण्याचा प्रयत्न केला. सदर गोलरक्षकाने यावेळी तो प्रयत्न निष्फळ ठरविला खरा, परंतु तो चेंडू त्याच्याकडे ठेवू शकला नाही. परत आलेला चेंडू छांगटेने जाळ्यात सारत भारताची आघाडी वाढविली.
तत्पूर्वी, भारतीयांनी सकारात्मक पद्धतीने सुऊवात केली आणि ते गोलच्या शोधात राहिलेले असले, तरी त्यांना मिळालेल्या काही संधींचे रुपांतर करता आले नाही. सहाव्या मिनिटाला आशिक कऊनियानला लेबनीज गोलक्षत्रात खाली पाडण्यात आल्यानंतर भारतीय संघाने त्वरित पेनल्टीची मागणी केली. परंतु पंचांनी त्यात रस दाखविला नी. त्यामुळे भारताचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच देखील संतापले.









