आशियाई क्रीडा स्पर्धा : बांगलादेशला केले पराभूत : क्रिकेटमध्ये भारतीय महिला सेमीफायनलमध्ये : रोईंगमध्ये डबल्स स्कल्स व लाईटवेट गटात भारत अंतिम फेरीत
वृत्तसंस्था /होंगझाऊ (चीन)
येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गुरुवारी भारताची कामगिरी जबरदस्त अशी राहिली. गुरुवारी सकाळच्या सत्रात महिला क्रिकेट संघाने थाटात सेमीफायनल गाठली तर नंतरच्या सत्रात रोईंग क्रीडाप्रकारात लाईटवेट व डबल्स स्कल प्रकारात भारतीय रोइंगपटूंनी अंतिम फेरी गाठत शानदार कामगिरी केली. यानंतर सुनील छेत्रीच्या एकमेव गोलच्या जोरावर भारताने बांगलादेशचा पराभव करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. दरम्यान, आज (दि. 22) रोजी भारताच्या टेबल टेनिस मोहिमेला प्रारंभ होणार आहे.
सुनील छेत्रीची कमाल, भारत विजयी
भारतीय संघ क्रिकेट असो किंवा फुटबॉल दोन्ही खेळात चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. या स्पर्धेतील पहिला विजय सुनील छेत्रीच्या नेतृत्वातील भारतीय फुटबॉल संघाच्या पारड्यात पडला आहे. भारताने बांगलादेशला पराभवाचा धक्का दिला आहे. यापूर्वी चीनविरुद्ध सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, बांगलादेशविरुद्ध भारताने जबरदस्त पुनरागमन करताना 1-0 असा शानदार विजय संपादन केला.
उभय संघात गोलसाठी चांगलीच झुंज पाहायला मिळाली. मात्र, भारताकडून कर्णधार सुनील छेत्रीने अखेरच्या क्षणी केला. या गोलमुळे भारतीय संघ बांगलादेशचा धुव्वा उडवण्यात यशस्वी झाला. विशेष म्हणजे, हा एकमेव गोल सुनीलने 85 व्या मिनिटाला केला. या सामन्यादरम्यान दोन्ही संघाचे खेळाडू सुरुवातीपासूनच गोल करण्यासाठी धडपड करत होते. मात्र, पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने शानदार खेळाचे दर्शन घडवले. यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गोल करण्याची अनेक संधी मिळाली. परंतु या संधीचा फायदा घेण्यात ते अपयशी ठरले. दरम्यान, एकवेळी असे वाटत होते की, सामना गोल न होता बरोबरीत सुटेल. मात्र, सामन्याच्या 85 व्या मिनिटाला सुनील छेत्रीने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. सुनीलने हा गोल पेनल्टी कॉर्नरवर केला. यानंतर अखेरपर्यंत भारताने ही आघाडी कायम ठेवत हा सामना 1-0 असा जिंकला.
आता म्यानमारचे आव्हान
भारतीय संघाचा पुढील सामना हा 24 सप्टेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात म्यानमारचे आव्हान असणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया मोठ्या फरकाने विजय मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
क्रिकेटमध्ये महिला संघ उपांत्य फेरीत दाखल

आशियाई गेम्समध्ये महिला क्रिकेट स्पर्धेतील दोन्ही उपांत्यपूर्व सामन्यात पावसामने व्यत्यय आणला. गुरुवारी (21 सप्टेंबर) या स्पर्धेचे दोन्ही उपांत्यपूर्व सामने आयोजित केले गेले होते. पण पावसामुळे दोन्ही सामन्यांना निकाल हाती आला नाही. परिणामी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही महिला क्रिकेट संघ उपांत्य सामन्यात पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, आशियाई स्पर्धेत भारतीय संघाला अव्वल मानांकन आहे. यामुळे हा सामना जरी रद्द झाला असला तरी अव्ववल रँकिंगच्या जोरावर टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. पहिला उपांत्यपूर्व सामना भारत आणि मलेशिया यांच्यात खेळवला गेला. भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकांमध्ये 2 गडी गमावत 173 धावा केल्या. सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 5.2 षटकांमध्ये 57 धावा करून संघाला वेगवान सुरुवात मिळवून दिली.

स्मृतीने 16 चेंडूत पाच चौकारासह 27 धावा केल्या. यानंतर शेफाली आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी भारताचा डाव सांभाळला. संघाची धावसंख्या 5.4 षटकात 1 बाद 60 धावा असताना पावसाने मैदानात हजेरी लावल्यामुळे सामना काही वेळासाठी थांबवावा लागला. पण पावसानंतर दोघींनी आक्रमक खेळी करताना दहाव्या षटकांत संघाचे शतक फलकावर लावले. शेफालीने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तसेच जेमिमा रॉड्रिग्जसोबत दुसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 86 धावांची भागीदारी केली. शेफालीने या सामन्यात 67 धावांची सर्वोत्तम खेळी केली, तर जेमिमाने 47 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या ऋचा घोषने अवघ्या 7 चेंडूत 21 धावांची खेळी केली. यामुळे भारताने 2 गडी गमावत 173 धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार मलेशियासमोर 15 षटकांत 177 धावांचे लक्ष्य होते. मलेशियाने दोन चेंडूत एक धाव घेतली होती, मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही. शेवटी सामना रद्द झाला आणि भारतीय संघाने चांगल्या रँकिंगच्या जोरावर उपांत्य फेरी गाठली. आता टीम इंडिया 24 सप्टेंबरला सेमीफायनल खेळणार आहे.
रोईंगमध्ये कमाल, दोन गटात भारत अंतिम फेरीत
गुरुवारी रोईंग या क्रीडाप्रकारात डबल्स स्कल व लाईटवेट गटात भारताने अंतिम फेरी गाठली आहे. दरम्यान, लाईटवेट गटात अर्जुन लाल जाट व अरविंद सिंह यांनी रिपेचेज राऊंडमध्ये 6:55:78 सेकंद अशी वेळ नोंदवत पहिले स्थान पटकावले. जपानने दुसरे तर फिलीपाईन्सने तिसरे स्थान मिळवले. आता, दि. 24 रोजी या गटात भारत सुवर्णपदकासाठी उतरणार आहे. दुसरीकडे डबल्स स्कल प्रकारात सतनाम सिंग व परमिंदर सिंग यांनी शानदार कामगिरी साकारताना 6:48:06 सेकंद अशी वेळ नोंदवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. विशेष म्हणजे, सतनाम व परमिंदर यांनी अप्रतिम अशी वेळ नोंदवली. त्यांच्या या कामगिरीमुळे या गटात भारत दि. 24 रोजी सुवर्णपदकासाठी उतरेल.
महिला फुटबॉलमध्ये चिनी तैपेईकडून भारत पराभूत
ब गटात झालेल्या महिला फुटबॉल सामन्यात चिनी तैपेई संघाने भारताचा 2-1 असा पराभव केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या भारतीय महिला संघाची दुसऱ्या सत्रात मात्र कामगिरी निराशाजनक राहिली. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना एकही गोल नोंदवता आला नाही. दुसऱ्या सत्रात मात्र 46 व्या मिनिटाला भारताच्या अंजू तमांगने शानदार गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर 68 व्या मिनिटाला लि चीनने गोल करत तैपेईला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. दोन्ही संघात गोलसाठी चांगलीच चुरस पहायला मिळाली. याचा फायदा तैपेईला झाला. 84 व्या मिनिटाला हुडा मेसजोदसने गोल नोंदवत संघाला 2-1 असे आघाडीवर नेले. यानंतर ही आघाडी कायम ठेवत तैपेईने हा सामना जिंकला. आता, भारतीय महिलांचा पुढील सामना रविवारी थायलंडविरुद्ध होईल.
एशियाडमध्ये आज भारत –
- रोईंग – उपांत्य फेरी (पुरुष सिंगल्स) दु. 12.30 पासून
- टेबल टेनिस – पुरुष व महिला संघाचे सामने, सकाळी 7.30 पासून
- व्हॉलीबॉल – उपांत्यपूर्व सामना, भारत वि चिनी तैपेई/मंगोलिया, सायं 5.30









