ऊपिन/ वृत्तसंस्था/ अॅस्टेना (कझाकस्तान)
येथे सुरू असलेल्या 2023 च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सोमवार अखेर भारतीय मल्लांनी चार पदकांची कमाई केली आहे. भारताचा ग्रीको रोमन प्रकारात खेळणारा मल्ल विकासने 72 किलो वजन गटात कांस्यपदक मिळवले.
पुरुषांच्या 72 किलो वजन गटातील ग्रीको रोमन पद्धतीमध्ये भारताच्या विकासने चीनच्या जियान तेनचा 8-0 असा एकतर्फी पराभव करत कास्यपदक घेतले. विकासने या वजनगटातील आपल्या पहिल्या सामन्यात कोरियाच्या जी येओन लीचा 11-0 असा एकतर्फी फडशा पाडत पुढील फेरीत स्थान मिळवले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इराणच्या साजेद इमनतलाबने विकासचा 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. त्यामुळे विकासला कास्यपदकाच्या लढतीत खेळावे लागले होते.
या स्पर्धेत भारताच्या अन्य तीन मल्लांनी विविध वजन गटात पदक फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता पण त्यांचे कांस्यपदक हुकले. 60 किलो गटात सुमित, 82 किलो गटात रोहित दाहिया तर 97 किलो गटात नरिंदर चिमा यांना हार पत्करावी लागली. तुर्कीच्या युमितला सुमितने पात्र फेरीच्या लढतीत तांत्रिक गुणावर पराभव केले होते पण त्यानंतर पुढील फेरीत किर्जीस्तानच्या झोलामनने सुमितचा 10-0 असा एकतर्फी पराभव केला. या वजन गटात किर्जीस्तानच्या झोलामनने सुवर्णपदक मिळवले. या वजन गटातील कांस्यपदकाच्या लढतीसाठी जपानच्या केवानाने सुमितचा 14-6 असा पराभव केला. 82 किलो वजन गटात कास्यपदकासाठीच्या लढतीत इराणचा अलीरेझा मोहमदीने रोहितचा पराभव केला. या वजन गटात अॅकीलबेक या किर्जीस्तानच्या मल्लाने अंतिम फेरी गाठली आहे. 97 किलो वजन गटात किर्जीस्तानच्या युझुरने नरिंदर चिमाचा 9-0 असा पराभव केला. या स्पर्धेत ग्रीको रोमन प्रकारामध्ये भारताने एकूण चार पदकांची कमाई केली आहे. 55 किलो गटात रुपीनने रौप्य 63 किलो गटात निरज, 87 किलो गटात सुनीलकुमार तर 72 किलो गटात विकास यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक मिळवले. सदर स्पर्धा 14 एप्रिलला संपणार आहे.









