आजवरची सर्वोत्तम कामगिरी, 11 सुवर्णांसह सातवे स्थान
ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर : सर्वाधिक चार पदके
वृत्तसंस्था/ चेंगडू, चीन
एफआयएसयू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये भारताने 26 विक्रमी पदके पटकावत सातवे स्थान मिळवून मोहिमेची सांगता केली. या स्पर्धेत भारताने नोंदवलेली ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. या 26 पदकांत 11 सुवर्ण, 5 रौप्य व 10 कांस्यपदकांचा समावेश आहे.
28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा चेंगडू येथे आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी 2015 मध्ये ग्वांगजू येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये भारताने सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 1 सुवर्ण, 1 रौप्य व 3 कांस्यसह एकूण 5 पदके मिळविली होती. याआधीच्या सर्व स्पर्धांत मिळून भारताने एकूण 21 पदके पटकावली होती. ती संख्याही यावेळी एकाच स्पर्धेत भारताने पार करीत नवा विक्रम नोंदवला. यावर्षीच्या स्पर्धेत भारताच्या जवळपास 230 खेळाडूंनी भाग घेतला होता. यातील नेमबाजी पथकाने सर्वाधिक 14 पदके पटकावली, त्यात 8 सुवर्ण, 4 रौप्य व 2 कांस्यपदके आहेत. ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर हा भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला. त्याने एकूण चार पदके पटकावली.
तोमरने पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल, 50 मी. 3 पोझिशन्स व 10 मी. एअर रायफल सांघिक प्रकारात सुवर्णपदके मिळविली तर पुरुषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन्स सांघिक विभागात कांस्यपदक मिळविले. युथ ऑलिम्पिक गेम्सची चॅम्पियन मनू भाकर व सिफ्ट कौर सामरा यांनीही काही सुवर्णपदके मिळविली. मनूने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल वैयक्तिक व सांघिक विभागात सुवर्ण मिळविले तर सिफ्ट कौरनी महिलांच्या 50 मी. रायफल 3 पी मध्ये मनूची पुनरावृत्ती केली. 10 हजार मी. चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रकुल व आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविणाऱ्या प्रियांका गोस्वामीने येथे मात्र सातवा क्रमांक मिळविला. भारतीय अॅथलीट्समध्ये तिचीच कामगिरी सर्वोत्तम झाली. मात्र आपला राष्ट्रीय विक्रम मोडण्यात ती 12 सेकंदाने कमी पडली. पूजा कुमारी, मानसी नेगी, निकिता लांबा यांनी अनुक्रमे 15, 16 व 21 वा क्रमांक मिळविला. वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सची पुढील आवृत्ती 2025 मध्ये जर्मनीत घेतली जाणार आहे.









