स्पर्धेवर भारतीयांचे वर्चस्व, एकूण 14 पदकांची कमाई
वृत्तसंस्था/ ताश्कंद
येथे झालेल्या आशिया चषक स्टेज 2 विश्व मानांकन तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड विभागात भारतीय तिरंदाजांनी वर्चस्व राखत सर्व पदके पटकावली. भारताने एकूण 7 सुवर्ण, 5 रौप्य व 2 कांस्यपदके पटकावली.
भारताच्या पुरुष व महिलांनी कंपाऊंड विभागात क्लीन स्वीप साधत 5 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्यपदके मिळविली. भारताला सर्व दहाही पदके मिळवित पूर्ण वर्चस्व साधण्याची संधी मिळाली होती. पण ती साधता आली नाही. रिकर्व्ह विभागातील तीन अंतिम फेरीत भारताला चीनच्या तिरंदाजांकडून पराभव स्वीकारावा लागला. असे असले तरी भारताने पदकतक्त्यातील अग्रस्थान मात्र कायम राखले. या स्पर्धेत बलाढ्या कोरियाचा सहभाग नव्हता. भारताच्या रिकर्व्ह तिरंदाजांनी 2 सुवर्ण, 3 रौप्य मिळविल्याने भारताची एकूण 14 पदके झाली.
पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह विभागातील पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळविलेल्या मृणाल चौहानला अंतिम फेरीत वांग बाओबिनकडून 2-6 असा पराभव स्वीकारावा लागला. मृणालला केवळ 2 गुणांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले. पहिल्या व तिसऱ्या सेटमध्ये बाओबिनने एकेक गुणाची आघाडी घेतली, हीच शेवटी निर्णायक ठरली. महिलांमध्ये संगीताकडून निराशाजनक कामगिरी झाली. तिने 3-1 अशी आघाडी घेतली होती. चौथ्या सेटमध्ये तिने स्वैर तिरंदाजी केल्याने तिला चीनच्या वु जियाझिनकडून 3-7 (27-26, 27-27, 26-27, 24-27, 26-30) असा पराभव पत्करावा लागला.
महिलांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात संगीता, मधू वेदवान, तनिशा वर्मा यांनीही निराशा केली. त्यांना चिनी संघाकडून 0-6 (52-56, 47-52, 51-52) असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. पुरुष संघाने व मिश्र दुहेरी संघाने मात्र भारताला सुवर्णपदके मिळवून दिली. मृणाल चौहान, तुषार शेळके, जयंत तालुकदार यांनी चीन संघावर 5-1 (57-54, 54-54, 54-51) अशी मात केली तर मिश्र दुहेरीत चौहान व संगीता यांनी चिनी जोडीवर 5-4 (36-37, 39-39, 37-37, 37-37, 20-18) अशी निसटती मात केली.
कंपाऊंड विभागात परमीत कौर, रागिणी मार्कू, प्रगती या महिला संघाने कझाक संघाचा 232-223 असा पराभव करून भारताला सुवर्ण मिळवून दिले. नंतर अभिषेक वर्मा, कुशाल दलाल, अमित या पुरुष संघाने हाँगकाँग संघाचा 233-226 अशा गुणांनी पराभव करून सुवर्ण मिळविले. अभिषेक वर्मा व परमीत कौर या मिश्र दुहेरीच्या जोडीने कझाकच्या जोडीवर 157-145 अशी मात करीत जेतेपद पटकावले. महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये रागिणीने आपलीच सहकारी प्रगतीचा शूटऑफमध्ये निसटता पराभव केला. दोघींनी 144-144 (10-10) समान गुण मिळविले होते. शूटऑफमध्ये रागिणी किंचीत सरस ठरली. परनीतने कांस्यपदक पटकावत या विभागात क्लीन स्वीप साधले. परनीतने कझाकच्या अदेल झेझेनबिनोवहावर कांस्यपदकाच्या लढतीत 143-141 अशी मात केली.
पुरुष कंपाऊंड विभागातही भारतीय खेळाडूंतच अंतिम लढत झाली. अभिषेक वर्माने कडवी लढत देणाऱ्या अमितचा शूटऑफमध्ये 143-143 (10-10) असा निसटता पराभव केला. नंतर दलालने कझाकच्या सर्जी ख्रिस्तीचचा 142-141 असा पराभव करून कांस्य मिळविले.









