वृत्तसंस्था/ कोलंबो
रविवारी येथे झालेल्या 2023 च्या श्रीलंका राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण 14 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 9 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कास्यपदकाचा समावेश आहे. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतीय अॅथलेटिक्सनी 6 सुवर्णपदके मिळविली. मिश्र सांघिक रिलेमध्ये भारताने रविवारी पहिले सुवर्णपदक मिळविले होते.
रविवारी झालेल्या मिश्र सांघिक 4×400 मी. प्रकारात भारताच्या अमोज जेकाब, ऐश्वर्या मिश्रा, मोहमद अनास आणि हिमांशी मलिक यांनी 3 मिनिटे, 17.33 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडाप्रकारात भारताच्या धावपटूंनी रौप्यपदकही मिळविताना 3 मिनिटे 18.03 सेंकंदाचा अवधी घेतला. पुरूषांच्या 4×400 मीटर रिले प्रकारात भारताने 3 मिनिटे 02.03 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक तर महिलांच्या 4×400 मीटर रिलेमध्ये सोनिया वैश्य, ऐश्वर्या मिश्रा, व्ही. सुभा आणि हिमांशु मलिक यांनी सुवर्णपदक मिळविताना 3 मिनिटे 30.41 सेकंदाचा अवधी घेतला. पुरूषांच्या भालाफेकमध्ये भारताच्या किशोरकुमार जेनाने सुवर्णपदक मिळविले असून तो या स्पर्धेतील सर्वोत्तम पुरूष अॅथलीट ठरला आहे.