वृत्तसंस्था/ अँटेलिया (तुर्की)
2022 च्या बिल जीन किंग सांघिक महिलांच्या टेनिस स्पर्धेतील शनिवारी झालेल्या आशिया ओसेनिया गट-1 मधील लढतीत भारतीय महिला टेनिस संघाने दक्षिण कोरियाचा 2-1 अशा फरकाने विजय मिळविला. त्याच प्रमाणे या गटातील अन्य एका लढतीत भारताने न्यूझीलंडचा 2-1 असा पराभव केला.
क्लेकोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय महिला संघाने सलग तिसरा विजय नोंदविला आहे. आशिया ओसेनिया गट-1 मध्ये पाच लढतीनंतर भारतीय संघ तिसऱया स्थानावर आहे. तत्पूर्वी भारतीय संघाला पहिल्या लढतीत जपानकडून तर दुसऱया लढतीत चीनकडून पराभव पत्करावा लागला होता. भारताने इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि दक्षिण कोरिया यांच्यावर विजय मिळविले आहेत. चीन संघाने तसेच जपानने या स्पर्धेच्या प्ले ऑफ फेरीकडे वाटचाल केली असून गट-2 मध्ये इंडोनेशिया आणि न्यूझीलंड यांची पदावनती झाली आहे.
भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या रिया भाटियाने कोरियाच्या किम रि हिचा दोन तासांच्या कालावधीत 6-3, 2-6, 6-3 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात भारताच्या अंकिता रैनाने कोरियाच्या किम बिनचा 6-2, 6-3 असा पराभव केला. महिला दुहेरीच्या सामन्यात कोरियाच्या हेन ली आणि किम रि या जोडीने भारताच्या सौजन्या आणि रिया भाटिया यांचा 6-1, 6-3 असा पराभव केला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या ऋतुजा भोसलेने न्यूझीलंडच्या गुमुलियाचा 6-4, 6-1, दुसऱया एकेरी सामन्यात भारताच्या अंकिता रैनाने न्यूझीलंडच्या सुजादीचा 6-1, 6-2 असा पराभव केला. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या जेसी रोमपिस आणि सुजादी यांनी भारताच्या सौजन्या व रिया भाटिया यांच्यावर 6-4, 6-7 (7-9), 6-2 असा विजय मिळविला.