वृत्तसंस्था / लाहोर
मे महिन्यात इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सेंट्रल आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेतून भारताने माघार घेतल्याची माहिती पाकिस्तान व्हॉलीबॉल फेडरेशनने रविवारी दिली.
या स्पर्धेसाठी भारताने 30 सदस्यांचा संघ पाठविण्याचा निर्णय घेतला होता. सदर स्पर्धा इस्लामाबादच्या जिना क्रीडासंकुलात 28 मे पासून सुरु होणार आहे. दरम्यान पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील राजकीय संबंध अधिक तणावग्रस्त झाल्याने भारतीय व्हॉलीबॉल संघाने या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. सदर स्पर्धेमध्ये इराण, तुर्केमेनीस्थान, किर्जीस्थान, ताजिकस्थान, उझबेकिस्थान यांचा समावेश आहे. आता भारताने या स्पर्धेतून माघार घेतल्याने अफगाण किंवा श्रीलंका संघाला संधी दिली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.









