वृत्तसंस्था/ मनामा, बहरिन
आशियाई युवा क्रीडास्पर्धेत कुराशमध्ये भारताने आणखी दोन पदके जिंकली आहेत. 14 वर्षीय कनिष्का बिधुरी आणि अरविंद यांनी अनुक्रमे एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवून भारताची या स्पर्धेतील कुराश प्रकारातील पदकांची संख्या तीनवर नेली.
मुलींच्या 52 किलो गटात कनिष्काला अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या करिमोवा मुबिनाबोनुकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी तिने उपांत्य फेरीत खलोलने जलालुद्दीन सेतायेशवर 10-0 असा विजय मिळवून जेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला होता, तर एक्झिबिशन वर्ल्ड बाहरिन येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तिने ‘योनबोश’ पद्धतीने थायलंडच्या खुंडी वारटचायाविऊद्ध विजय मिळवला होता.
मुलांच्या 83 किलो गटात अरविंदने उपांत्य फेरीत खलोल पद्धतीने दावलतझोदावर 10-0 असा विजय मिळवला, पण उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या गोलिबोव्ह शोहजाहोनकडून 0-10 असा पराभव पत्करावा लागला. युवा खेळांमध्ये कांस्यपदकासाठी ‘प्लेऑफ’ लढती नसतात. खलोल हा शब्द कुराशमध्ये खात्रीशीर विजयासाठी वापरला जातो, तर योनबोश म्हणजे कमी परिपूर्ण थ्रोसाठी अर्धा गुण असतो. रविवारी 15 वर्षीय खुशीने महिलांच्या 70 किलो गटातील कुराश स्पर्धेत कांस्यपदक मिळवून भारताचे खाते उघडले होते.









