निश्चित भारतीय तिरंदाजांकडून दोन नवे विश्वविक्रम
वृत्तसंस्था/ सिंगापूर
येथे सुरू असलेल्या आशियाई चषक दुसऱ्या टप्प्यातील तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ कंपाऊंड तिरंदाजांनी आपले वर्चस्व कायम राखत पुरुष व महिलांच्या वैयक्तिक विभागात अंतिम फेरी गाठली.
अग्रमानांकित कुशल दलालने पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड विभागात अंतिम फेरी गाठताना उपांत्य फेरीत बांगलादेशच्या हिमू बच्छारचा 147-143 असा पराभव करीत किमान रौप्यपदक निश्चित केले. पात्रता फेरीतही दलालने 714 गुण घेत आघाडीचे स्थान मिळविले होते. दरम्यान, भारताच्या दहाव्या मानांकित सचिन छेचीला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ मॅचनकडून पराभव पत्करावा लागला. आता कांस्यपदकासाठी सचिनची लढत बांगलादेशच्या हिमू बच्छारशी होईल.
महिला विभागातील वैयक्तिक कंपाऊंडमध्ये भारताचे सुवर्ण व रौप्य निश्चित झाले आहे. कारण अग्रमानांकित षन्मुखी नागा साई बुद्दे व द्वितीय मानांकित तेजल साळवे या दोन भारतीयांनी अंतिम फेरी गाठली असून त्यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. षन्मुखीने पात्रता फेरीत 706 गुण मिळविले. तिने उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या युरिके निना बोनिता पेरेरावर 145-139 अशा गुणांनी मात केली. पात्रता फेरीत 700 गुण मिळविणाऱ्या तेजलने उपांत्य लढतीत मलेशियाच्या फातिन नुरफतेहाह मत साल्लेहवर 147-142 अशा गुणांनी मात केली.
तत्पूर्वी, भारतीय तिरंदाजांनी दोन नवे विश्वविक्रम नोंदवत लक्षवेधी कामगिरी केली. महिलांची कंपाऊंड टीम षन्मुखी, तेजल व तनिष्का ठोकल यांनी एकूण 2101 गुण नोंदवत पात्रता फेरीतील नवा विश्वविक्रम नोंदवला तर मिश्र सांघिक प्रकारात कुशल दलाल व षन्मुखी यांनी एकूण 1420 गुण घेत आणखी एक नवा विश्वविक्रम नोंदवला.









