वृत्तसंस्था/ थिंपू, भूतान
भूतानच्या चांगलिमिथांग स्टेडियमवर झालेल्या सॅफ 17 वर्षांखालील महिला अजिंक्यपद स्पर्धा 2025 च्या शेवटच्या सामन्यात भारताला बांगलादेशकडून 3-4 असा पराभव पत्करावा लागला. पराभूत होऊनही त्यांना विजेतेपदाचा किताब देण्यात आला कारण त्यांनी एक सामना शिल्लक असतानाच गुणतक्त्यावर अजिंक्य अशी आघाडी मिळवली होती, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अधिकृत वेबसाइटने नमूद केले आहे. भारतीय संघाने सदर स्पर्धेचा शेवट पाच विजय आणि एका पराभवासह केला.
पूर्णिमा मार्माने किक ऑफ केल्यानंतर 30 सेकंदांत बांगलादेशला आघाडी मिळवून दिली आणि संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने स्वीकारलेला हा पहिला गोल होता. त्यानंतर नवव्या मिनिटाला अनुष्का कुमारीने बांगलादेशच्या गोलक्षेत्रात घुसून पुढे येणारी गोलरक्षक आणि दोन बचावपटूंना चकवत शांतपणे गोल करून बरोबरी साधली. तथापि, 34 व्या मिनिटाला भारतीय गोलक्षेत्रात गोंधळ सुरू असताना बांगलादेशने पुन्हा एकदा आघाडी मिळवली. अल्पी अख्तरने जवळून गोल करून 2-1 अशी आघाडी घेतली.
भारताला बरोबरी साधण्याच्या अधिक संधी मिळाल्या होत्या. 24 व्या मिनिटाला अनुष्काने पुन्हा उजव्या बाजूने गोलक्षेत्रात घुसून फटका हाणला, पण तो डाव्या बाजूने थोडासा बाहेर गेला. मध्यांतराच्या अगदी आधी भारताची कर्णधार जुलानला बांगलादेशच्या कुलसुमने फाउल केल्याने फ्री-किक मिळाली. त्यावर अनुष्काने हाणलेला शक्तिशाली फटका गोलपोस्टवर आदळल्याने तिची निराशा वाढली.
दुसऱ्या सत्रात बांगलादेशने पुन्हा सुऊवातीलाच आघाडी वाढवली. 48 व्या मिनिटाला सौरवी प्रीतीने भारतीय गोलक्षेत्रात धाव घेतली आणि दोन बचावपटू आणि गोलरक्षक मुन्नीला चकवून 3-1 अशी आघाडी वाढवली. दुसरीकडे, भारताने अनेक संधी निर्माण करणे सुरू ठेवले आणि 59 व्या मिनिटाला प्रीतिका बर्मनच्या क्रॉसवर व्हॅलाइनाने मारलेला हेडर बाहेर गेला. 65 व्या मिनिटाला प्रीतिकाने उजव्या बाजूने मुसंडी मारत गोल करून प्रतिस्पर्ध्यांची आघाडी 3-2 अशी कमी केली. प्रीतिकाने 67 व्या आणि 69 व्या मिनिटाला आणखी संधी निर्माण केल्या, परंतु बांगलादेशच्या बचावपटूंनी आणि गोलरक्षकाने हे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. भारताने अखेर 89 व्या मिनिटाला जुलनच्या गोलक्षेत्राच्या बाहेरून हाणलेल्या फटक्यावर बरोबरी साधली. तथापि, इंज्युरी टाइममध्ये प्रीतीने विजयी गोल करून बांगलादेशचे पारडे भारी बनविले.
सहा सामन्यांमध्ये आठ गोल करणाऱ्या अनुष्का कुमारीने स्पर्धेतील सर्वांत जास्त गोल करणाऱ्या खेळाडूचा पुरस्कार पटकावला. गेल्या वर्षी सॅफ 16 वर्षांखालील महिला स्पर्धेत संयुक्तपणे सर्वाधिक गोल करणारी खेळाडू ठरल्यानंतर तिला मिळालेला हा अशा प्रकारचा दुसरा पुरस्कार आहे. चार गोल आणि गोलासाठी तीन वेळा साहाय्यांसह अभिस्ता बसनेटने स्पर्धेतील सर्वांत मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार जिंकला. ऑक्टोबरमध्ये किर्गिझ प्रजासत्ताकमधील बिश्केक येथे होणाऱ्या आगामी एएफसी 17 वर्षांखालील महिला आशियाई कप पात्रता फेरीसाठी तयारी करण्याकरिता संघ आता बेंगळूरला जाणार आहे.









