वृत्तसंस्था/ थिम्पू
भारताच्या 16 वर्षांखालील संघाने येथील चांगलिमिथांग स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत बांगलादेशचा 2-0 असा पराभव करून सॅफ 16 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पूर्वार्धात भरत लैरेनजामने (8 व्या मिनिटाला) गोल केल्यानंतर लेव्हिस झांगमिनलुनने दुसऱ्या सत्रामध्ये (74 व्या मिनिटाला) गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुख्य प्रशिक्षक इश्फाक अहमद यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाची संपूर्ण स्पर्धेतील वाटचाल चमकदार राहिली. त्यांनी केलेल्या सहज आणि आक्रमक खेळासमोर विरोधकांना संघर्ष करावा लागला. त्यांनी बांगलादेश आणि नेपाळला प्रत्येकी 1-0 ने पराभूत करून ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले. मालदीवसोबतची उपांत्य फेरीतील लढत ही त्यांच्यासाठी उत्कृष्ट राहून त्यात त्यांनी 8-0 असा विजय झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे संघाने संपूर्ण स्पर्धेत एकही गोल न स्वीकारता हे सर्व साध्य केले.
बांगलादेशविऊद्धच्या अंतिम सामन्यात भारताने उत्कृष्ट डावपेच आणि चेंडूवरील नियंत्रण दाखवले. चांगल्या प्रकारे चेंडू पुरवून आणि उपलब्ध मोकळ्या जागेचा हुशारीने वापर करून त्यांनी बांगलादेशच्या जास्त शारीरिक पद्धतीच्या खेळाचा प्रभावीपणे सामना केला. मोहम्मद अर्बाश, विशाल यादव आणि लेव्हिस झांगमिनलून यासारख्या प्रमुख खेळाडूंनी बांगलादेशी बचाव वेळोवेळी भेदला, ज्यामुळे भारताला सुऊवातीपासून शेवटपर्यंत वर्चस्व ठेवणे सोपे गेले.
भारताच्या बचावाच्या केंद्रस्थानी करिश सोराम हा राहिला. सदैव दक्ष राहून परिस्थितीनुरुप निर्भयपणे तो बांगलादेशच्या आक्रमणापुढे उभा ठाकला आणि जेव्हा जेव्हा बांगलादेशने त्याचा अडथळा दूर सारून पुढे जाण्याचा मार्ग शोधला तेव्हा भारताचा गोलरक्षक अहिबाम सूरज सिंग हा त्यांच्यासाठी प्रमुख अडथळा ठरला. सामना सुरू होऊन आठ मिनिटांतच भारताच्या लेव्हिस झांगमिनलुनने भरत लैरेंजामला चेंडू पुरविला आणि त्याने बांगलादेशचा गोलरक्षक मोहम्मद नाहिदुल इस्लामच्या पायांमधून चेंडू फटकावून गोल केला.









