ज्योती, परनीत, अदिती यांनी कंपाऊंड विभागात मिळविले यश
वृत्तसंस्था/ बर्लिन
येथे सुरू असलेल्या विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या महिला कंपाऊंड संघाने सुवर्णपदक पटकावत नवा इतिहास निर्माण केला. या स्पर्धेत भारताने आजवर मिळविलेले हे पहिलेच सुवर्ण आहे. अंतिम फेरीत भारतीय महिला संघाने मेक्सिकोचा पराभव केला. भारतीय संघात ज्योती सुरेखा व्हेन्नम, परनीत कौर, आदिती स्वामी यांचा समावेश आहे.
भारतीय महिलांनी उपांत्य फेरीतही विद्यमान विजेत्या कोलंबियाला 220-216 असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत चिनी तैपेईला 228-226 असे हरविले होते. अंतिम लढतीत मेक्सिकोवर 235-229 अशा गुणांनी मात केली. 1981 मध्ये इटलीतील पुन्ता अॅला येथे झालेल्या वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताने पदार्पण केले होते आणि 42 वर्षानंतर सुवर्ण मिळविण्यात भारताला पहिल्यांदाच यश मिळाले. यापूर्वी रिकर्व्ह विभागात भारताला अंतिम फेरीत चारवेळा तर कंपाऊंड विभागात पाचवेळा पराभूत व्हावे लागले होते. ‘याआधी आम्ही पुरेशी रौप्यपदके मिळविली आहेत, यावेळी सुवर्णपदकच मिळवायचे असा आम्ही निर्धार केला होता. ही फक्त सुरुवात असून यापुढेही आणखी पदके जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ असे विजेत्या संघातील ज्योती सुरेखा वेन्नम म्हणाली. अलीकडेच वर्ल्ड चॅम्पियन बनलेली 17 वर्षीय अदिती ही या संघातील सर्वात लहान वयाची तिरंदाज आहे. ‘पहिले सुवर्णपदक मिळविणे आणि भारतीय तिरंगा उंच फडकताना पाहणे हा खास क्षण आहे,’ असे ती म्हणाली.
भारताच्या रिकर्व्ह संघाला मात्र पदकाच्या फेरीपर्यंत पोहोचता आले नाही. नेदरलँड्समधील डेन बॉश येथे 2019 मध्ये झालेल्या विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताने शेवटचे पदक जिंकले होते. त्यावेळी तरुणदीप राय, अतानू दास, प्रवीण जाधव या पुरुष संघाने रौप्यपदक मिळविले होते.
मेक्सिकोविरुद्धच्या अंतिम लढतीत ज्योती, अदिती व परनीत यांनी प्रारंभापासूनच वर्चस्व ठेवले. पहिल्या तीन फेऱ्यांत त्यांनी 60 पैकी गुण मिळवित 177-172 अशी आघाडी घेतली. शेवटच्या फेरीत 58 गुण घेत भारताने पहिले सुवर्ण निश्चित केले. 27 वर्षीय ज्योतीसाठी हे सुवर्ण जास्त मोलाचे आहे. यापूर्वी चारदा तिची ही संधी हुकली होती. तिने आतापर्यंत या स्पर्धेत 1 सुवर्ण, 4 रौप्य व 2 कांस्यपदके मिळविली आहेत. या तिघींनी वैयक्तिक प्रकारातही उपांत्यपूर्व फेरी गाठत पदकाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
आजचे सामने
1) कोरिया वि. जपान, दु. 4 वा.
2) मलेशिया वि. पाकिस्तान, सायं. 6.16 वा.
3) भारत वि. चीन, रात्री 8.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 एचडी, फॅनकोड.









